यावल, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील तालुक्याला लागुन असलेल्या सातपुडा अभयारण्य वन्यजीव क्षेत्रात गेल्या पाच दिवसांपासून अतिक्रमण काढण्याची मोहिम राबवली जात असून आतापर्यत ६१ झोपड्यांसह ४७.७८० हेक्टर जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यात आले असल्याची माहिती वनविभागाने दिली.
यावल तालुकापरीसरातील सातपुड्याच्या अभयारण्यात मध्यप्रदेशातून चोरटया मार्गाने आलेल्या परप्रांतीय नागरीकानी अनधिकृतपणे केलेल्या ४७.७८० हेक्टर जमिनीवरील अतिक्रमण तसेच निर्बंध असलेल्या वनक्षेत्रात उभारलेल्या अतिक्रमीत ६१ झोपड्या देखील वनविभागाच्या पथकाने जमीनदोस्त केल्या आहेत. या मोहिमेसाठी स्थानिक पातळीवर तालुका दंडाधिकारी यांची नेमणूक करण्यात येऊन यावल पोलिसांसह राज्य राखीव पोलिस दलाची एक तुकडी वनक्षेत्रात असून जेसीबी सह विविध फौज फाटा वन क्षेत्रात तैनात करण्यात आला आहे.
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी यावल अभयारण्यात वन्यजीव क्षेत्रात अतिक्रमण विरोधी मोहीम राबविली जाते. यावर्षी देखील गेल्या पाच दिवसांपासून वनक्षेत्रातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम नाशिक विभागाचे प्रधान वनसंरक्षक वन्यजीवचे सुनील लिमये, वन्यजीव नाशिकचे यशवंत केसकर, धुळे प्रादेशिक वनसंरक्षक दिगंबर पगार, यावल उपवनसंरक्षक प्रादेशिक पद्मनाभ, जळगाव उपवनसंरक्षक विवेक होशिंग यांचे आदेशानुसार यावल वन्यजीव सहाय्यक वनसंरक्षक अश्विनी खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली.
यात वनपरिक्षेत्र अधिकारी वन्यजीव पाल अमोल चव्हाण सह पथकाने जामन्या वनक्षेत्रातील लंगडा आंबा परिमंडळ व करंजपाणी परिमंडळासह अभयारण्यातील ४७.७८० हेक्टर क्षेत्रावर मुख्यत्वे मध्य प्रदेशातील लोकांनी केलेल्या अनधिकृत ६१ झोपड्या व वनजमिनीवरील अतिक्रमण हटविण्यात येऊन वनजमीन ताब्यात घेण्यात आली या धडक कारवाईमुळे वनक्षेत्रात अतिक्रमण करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
अतिक्रमण निर्मूलनासाठी यांनी दिला सह्भाग
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, यावल पोलिस निरीक्षक तथा परिविक्षाधीन आयपीएस आशीष कांबळे, प्रांताधिकारी कैलास कडलग, तहसीलदार महेश पवार यांनी मनुष्यबळ व संरक्षण उपलब्ध करीत अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवली असून वनक्षेत्रात अजूनही बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे.
दंडाधिकाऱ्यांची नियुक्ती
वनक्षेत्रात कुठल्याच प्रकारचे मोबाईल नेटवर्क किंवा संपर्काची सुविधा नसल्याने अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईत अटीतटीच्या प्रसंगी काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असल्यास प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी तालुका दंडाधिकाऱ्याची नियुक्ती करीत वनक्षेत्रात कारवाई करिता उपवनसंरक्षक अश्विनी खोपडे यांचेसह वनपरिक्षेत्र अधिकारी वन्यजीवचे अमोल चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, दंडाधिकारी शेखर तडवी तसेच राज्य राखीव पोलीस बलाची एक तुकडी वनपरिक्षेत्र जामन्या व पाल तसेच वनपरिक्षेत्र प्रादेशिक मधील यावल पूर्व ,यावल पश्चिम, चोपडा, वैजापूर, देवझिरी, रावेर वनपाल, वनरक्षक तसे वनमजूर हे आवश्यक ठिकाणी उपस्थित होते.
वनजमिनीवर चाऱ्या खोदल्या आता रोपवन उभारणार
वन जमिनीवर वनक्षेत्रातील अतिक्रमण हटविण्यात आल्यानंतर अतिक्रमित जागेवर जेसीबीद्वारे खोलवर चर खोदण्यात आले आहेत. आवश्यक ठिकाणी जमीन उंच-सखल करण्यात आली आहे. तसेच पावसाळ्यात येथे बाभूळ सह विविध प्रकारच्या वृक्षांची बी टाकण्यात येऊन भविष्यात येथे अतिक्रमण होणार नाही याची दक्षता वनविभागाकडून घेतली जाणार आहे.
अश्विनी खोपडे, सहाय्यक वनसंरक्षक, यावल वन्यजीव विभाग