यावल वनविभागाची धडक कारवाई; सागवान लाकडांची तस्करी करणारे तिघे जेरबंद

0
107


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल वनविभागाने अवैध वृक्षतोड करणाऱ्या तस्करांवर मोठी कारवाई करत मालापूर उत्तर नियतक्षेत्रातून तीन आरोपींना रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्याकडून १४ नग सागाचे लाकूड आणि अवैध कामासाठी वापरल्या जाणाऱ्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वनविभागाच्या पथकाने ही कारवाई केली. वैजापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी विकेश ठाकरे आणि त्यांच्या रेंज स्टाफने मालापूर उत्तर (कक्ष क्रमांक २३१) या जंगल भागात गस्त सुरू केली होती. गस्त सुरू असतानाच त्यांना कुऱ्हाडीने झाड तोडण्याचा आवाज ऐकू आला. आवाजाच्या दिशेने पथक जात असल्याची चाहूल लागताच अज्ञात इसमांनी जंगलात पळून जाण्याचा प्रयत्न केला.

वनकर्मचाऱ्यांनी केली यशस्वी घेराबंदी
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने पळणाऱ्या आरोपींचा पाठलाग करत जंगलात त्यांची घेराबंदी केली. या यशस्वी पाठलागात तीन आरोपींना पकडण्यात यश आले, तर काही आरोपी पसार झाले. पकडलेल्या आरोपींकडून तात्काळ तोडण्यात आलेले साग वृक्षाचे १४ नग जप्त करण्यात आले. या सागाच्या लाकडाचे मोजमाप ०.५७९ घनमीटर असून त्याची किंमत सुमारे १३,२७५ रुपये आहे.

त्यानंतर जंगल परिसरात तपासणी केली असता, तस्करांनी लपवून ठेवलेल्या दोन मोटारसायकली (वाहन किंमत अंदाजे ४५,००० रुपये) देखील जप्त करण्यात आल्या आहेत. या मोटारसायकली अवैध लाकूड वाहतुकीसाठी वापरल्या जात होत्या, असा अंदाज आहे. या घटनेप्रकरणी वनरक्षक, मालापूर उत्तर यांनी तातडीने गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

उच्चाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम
सदरची महत्त्वपूर्ण कारवाई वनसंरक्षक निनू सोमराज (धुळे प्रादेशिक), उपवनसंरक्षक जमीर शेख (यावल वनविभाग जळगाव), विभागीय वन अधिकारी राजेंद्र सदगीर (दक्षता धुळे), सहाय्यक वनसंरक्षक एम बी पाटील (चोपडा), आणि सहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील (यावल) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत वनपरिक्षेत्र अधिकारी विकेश ठाकरे सर यांच्यासह वैजापूर वनक्षेत्रातील सर्व वनपाल, वनरक्षक, वनसेवक आणि वाहन चालक सहभागी झाले होते.