यावल-भुसावळ रस्त्याच्या दुर्दशेने वाहनधारक त्रस्त : दुरुस्तीची मागणी

7b297a81 6aa9 47f5 a7d6 366d07dd14a6

यावल (प्रतिनिधी) येथील यावल-भुसावळ रस्त्यावर अनेक ठीकाणी खड्डे पडण्यास पुनश्च सुरुवात झाली असुन, चार वर्षात तीन वेळा रस्ता दुरुस्त केल्यावरही जर वारंवार असे प्रश्न निर्माण होत असतील तर ठेकेदाराच्या कार्यक्षमतेची येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने तपासणी करणे गरजे झाले आहे.

 

या संदर्भात अधिक माहिती अशी की, यावल-भुसावळ हा १७ किलोमीटरचा मार्ग असुन, भुसावळ शहर हे यावल तालुक्यातील गावांशी जोडलेली मोठी बाजार पेठ आहे. याशिवाय भुसावळ हे जंक्शन रेल्वे स्टेशन असल्याने या मार्गावर जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनाची नेहमीच मोठी वर्दळ असते, असे असतांना या मार्गावर चोपडा-यावल या मार्गाने नागपुर जाणाऱ्या अवजड वाहनांची यात मोठी भर पडते, या मार्गावर क्षमतेपेक्षा अधिक वजनांच्या अवजड वाहनांची वाढणारी वर्दळ ही मोठ्या अपघातांना निमंत्रण देणारी आहे. मागील काही वर्षात अशाच अवजड वाहनांमुळे अनेक अपघात होवुन यात अनेक निरपराध लोकांचे बळी गेले आहेत.

यावल ते भुसावळ मार्गावरील रस्ता लाखो रुपये खर्च करून काही दिवसांपुर्वीच दुरुस्त करण्यात आला आहे. या १७ किलोमीटर रस्त्यावर संबंधीत ठेकेदाराने पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी साईडपट्टयांचे काम योग्यप्रकारे न केल्याने अवजड वाहनांच्या कायम वाढणाऱ्या रहदारीमुळे रस्ता अनेक ठिकाणी अरुंद झाला आहे. मोठ्या वाहनांचा यामुळे समतोल बिघडतो व यातुन अपघात होतात, या मार्गावर असलेल्या मोर नदीच्या पुलाचीही हिच अवस्था झाली आहे. लाखो रुपये खर्च करूनही या पुलावरून वाहन कोसळुन झालेल्या अपघातात अनेक लोक मरण पावले आहेत. या मोर नदीच्या धोकादायक वळणावर दोघ बाजुस टेकड्या असल्याने पुलावरून जातांना किंवा येतांना दोघ बाजुचे समोरच्या दिशेने येणारे वाहन चालकास दिसुन येत नाही, त्यामुळे या पुलावरून वाहने कोसळुन अनेक अपघात झाले आहेत. या पुलावर संरक्षण म्हणुन लावण्यात आलेली लोखंडी साईड ग्रील कठडे हे मोटर वाहनांचे अपघात थांबविण्यात असमर्थ ठरले आहेत. या प्रकारांमुळे दैनंदीन आपल्या कामासाठी ये-जा करणारे वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ या मार्गावर पडलेले खड्डे भरून व अरुंद झालेला रस्ता योग्यप्रकारे समतोल करावा, अन्यथा येणाऱ्या पावसाळयात वाहनधारकांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Add Comment

Protected Content