धनखड हत्या प्रकरणी कुस्तीपटू सुशील कुमारला जामीन मंजूर

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ज्युनियर राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियन सागर धनखड यांच्या हत्येच्या आरोपाखाली तुरुंगात असलेला ऑलिंपिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार याला दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात सुशीलला 2 जून 2021 रोजी अटक करण्यात आली होती. सुशील कुमार हे भारतीय कुस्तीतील एक मोठे नाव आहे, पण 2021 मध्ये घडलेल्या हत्येच्या घटनेने त्याचे कुस्तीतील करिअर पूर्णपणे उद्ध्वस्त केले.

कुस्तीपटू सागर धनखडच्या हत्येच्या आरोपाखाली ऑलिंपियन सुशील कुमार अनेक वर्षे तुरुंगात होता. सुशील कुमारवर 4 मे 2021 रोजी मालमत्तेच्या वादातून दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमच्या पार्किंगमध्ये सागर धनखड आणि त्याचे मित्र जय भगवान व भगत यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या सागर धनखडचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर सुशील कुमारला अटक करण्यात आली.

2023 मध्ये, सुशील कुमार यांना वैद्यकीय कारणास्तव एका आठवड्यासाठी अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता. सुशील कुमारला गुडघ्याला दुखापत झाली होती, त्यानंतर डॉक्टरांनी त्याला गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे 23 जुलै ते 30 जुलै दरम्यान त्याला अंतरिम जामीन देण्यात आला होता.

सुशील कुमारने कुस्तीमध्ये भारतासाठी ऑलिंपिकमध्ये दोन पदके जिंकली आहेत. 2008 च्या बीजिंग ऑलिंपिकमध्ये त्याने कांस्यपदक मिळवले आणि 2012 च्या लंडन ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक जिंकले. सलग दोन ऑलिंपिकमध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू म्हणून त्याने इतिहास रचला. त्यामुळेच तो देशातील तरुण कुस्तीगीरांसाठी एक आदर्श बनला होता.

सुशील कुमारवरील गंभीर आरोपांमुळे त्याचे कुस्तीतील योगदान आणि त्याच्या प्रतिमेवर मोठा परिणाम झाला आहे. आता उच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केल्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रियेवर सर्वांचे लक्ष असेल.

Protected Content