दुबई-वृत्तसंस्था | भारतीय संघाने टिच्चून गोलंदाजी करत पाकला 241 धावांमध्ये गुंडाळले असून आता आपल्या टिमला जिंकण्यासाठी 242 धावा करावयाच्या आहेत.
आज चैंपियंस ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबईत रोमांचक सामना खेळला जात आहे. पाकिस्तानला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता, तर भारताने बांगलादेशविरुद्ध पहिला सामना जिंकला होता. त्यामुळे भारतीय संघाची नजर सलग दुसऱ्या विजयासह सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित करण्यावर आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारतासमोर २४२ धावांचे लक्ष्य ठेवले.
पाकिस्तानची संपूर्ण डाव ४९.४ षटकांत २४१ धावांवर आटोपली. भारताने सलग पाचव्या वनडे सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला ५० षटकांच्या आत बाद केले आहे. हर्षित राणाने खुशदिल शाहला विराट कोहलीच्या हाती झेलबाद करत पाकिस्तानची खेळी संपवली. खुशदिलने ३९ चेंडूंमध्ये दोन षटकारांसह ३८ धावा केल्या. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या, यात कुलदिपची हॅटट्रीक चुकली. तर हार्दिक पांड्याने दोन विकेट्स मिळवल्या. हर्षित राणा, अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
पाकिस्तानला बाबर आझम आणि इमाम उल हक यांनी सावध सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी झाली. ही जोडी हार्दिक पांड्याने तोडली. त्याने बाबरला २६ चेंडूंमध्ये पाच चौकारांसह २३ धावांवर विकेटकीपर केएल राहुलच्या हाती झेलबाद केले. पुढच्याच षटकात इमाम उल हक २६ चेंडूंमध्ये १० धावा काढून धावबाद झाला. ४७ धावांवर दोन विकेट पडल्यानंतर सऊद शकील आणि कर्णधार मोहम्मद रिझवान यांनी डाव सावरला. तिसऱ्या विकेटसाठी १०४ धावांची भागीदारी झाली. यात शकीलने आपल्या वनडे कारकिर्दीतील चौथे अर्धशतक झळकावले. ही भागीदारी अक्षर पटेलने तोडली. त्याने रिझवानला ७७ चेंडूंमध्ये तीन चौकारांसह ४६ धावांवर स्वच्छ बाद केले. रिझवान बाद झाल्यावर पुन्हा विकेट्सचा खच पडला. शकील ७६ चेंडूंमध्ये पाच चौकारांसह ६२ धावा काढून हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर बाद झाला. तैयब ताहिर चार धावा आणि सलमान अली आगा १९ धावा काढून बाद झाले. सलमानला कुलदीपने, तर तैयबला जडेजाने बाद केले. शाहीन आफ्रिदीला खाते उघडता आले नाही. नसीम शाहने १४, तर हारिस रऊफने आठ धावा केल्या.
भारताच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. कुलदीप यादवने आपल्या फिरकीने तीन बळी घेतले, तर हार्दिक पांड्याने दोन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. हर्षित राणाने निर्णायक टप्प्यावर खुशदिलला बाद करत सामन्यावर भारताची पकड मजबूत केली.
आता भारताला हा सामना जिंकण्यासाठी २४२ धावांचे लक्ष्य गाठावे लागणार आहे. भारतीय फलंदाज या आव्हानाला कसे सामोरे जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.