फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भगवान दत्तात्रयांनी २४ गुरू केले. जो जो जयांघेतला मी गुण, तो तो गुरु केला मी जाण. स्वयं तेज असणाऱ्या भगवान दत्तात्रयांना २४ गुरू करण्याची काय आवश्यकता आहे ? तर जिथे चांगले गुण शिकायला मिळाले तेथे त्यांनी तो तो गुण गुरु केला. गुरु केल्याने नव्हे तर गुरूंच्या आदेशाचे पालन केल्याने आपला उद्धार होतो अशी गुरूंची महती आहे, असे महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांनी सांगितले.
फैजपूर येथील त्रिमूर्ती चौकात आयोजित गुरु जगन्नाथ महाराज यांच्या बाविसाव्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त निरूपण करतांना बोलत होते. १० डिसेंबर ते १३ डिसेंबर २३ दरम्यान दत्तात्रय भगवान यांच्या २४ गुरू विषयी विवेचन होणार आहे. अमृतवाणी सत्संगाच्या पहिल्या दिवशी निरूपण करताना त्यांनी सांगितले की, स्वभाव मधुर वाणी चांगले विचार निष्कपटपणा सहजता सरलता या गुणांमुळे मी जगन्नाथ महाराजांना गुरु म्हणून स्वीकारले. गुरु वैकुंठवासी होत नाही. गुरु आदर्श, मर्यादा, विवेक, सद्गुण, विचार, मार्गदर्शन अशा ज्ञानाचा खजिना आहे. ते त्यांच्या ज्ञानाने विचाराने आपल्या सोबत असतात. आपल्याला योग्य शिष्य बनता आले पाहिजे. सोळावे वरिस धोक्याचे नाही तर मोक्याचे आहे. संत ज्ञानेश्वर माऊली सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहितात. माऊलींचे २२ व्या वर्षी गुरूंच्या समोर समाधी घेण्याचे विचार किती प्रेरणादायी आहे. गुरूंना सत्कर्म अर्पण करावे भाव द्यावा समर्पण द्यावे. असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला ब्रह्मकुमारी शकुंतला दीदी, मीरा दीदी, प्रथम दिवसाचे मानकरी पांडुरंग शेठ सराफ, युवा नेते धनंजय चौधरी, यांच्यासह महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश व परिसरातील मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे श्री सद्गुरू गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था नायगव्हाण, ता. फुलंब्री या संस्थेचे हभप रवींद्र महाराज महाले यांच्यासोबत आलेले सुमारे दीडशे वारकरी विद्यार्थी सकाळी काकड आरती व सायंकाळी हरिपाठ मधुर स्वरात तल्लीन होऊन आनंदोत्सव साजरा करीत आहे.