दुबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ च्या अंतिम सामन्याची तारीख जाहीर केली आहे. इंग्लंडचे ऐतिहासिक मैदान असलेल्या लॉर्ड्सवर ११ ते १६ जूनदरम्यान अंतिम सामना खेळवला जाईल. १६ जून हा राखीव दिवस म्हणून ठेवला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासातील हा तिसरा अंतिम सामना असेल आणि लॉर्ड्सवर पहिल्यांदाच विजेतेपदाची लढत होणार आहे.
डब्ल्युटीसीची पहिली फायनल २०२१ मध्ये साउथॅम्प्टन येथे खेळली गेली होती, तर २०२३ च्या विजेतेपदाची लढत ओव्हल मैदानावर झाली होती. २०२५ चा अंतिम सामना कोणत्या संघांमध्ये खेळवला जाईल हे अद्याप निश्चित झालेले नाही. सध्या गुणतालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलिया अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. येत्या काही महिन्यांत सर्वच संघ भरपूर कसोटी सामने खेळणार आहेत, त्यानंतर कोणते संघ डब्ल्युटीसीची फायनल खेळणार हे निश्चित होईल.