Home Cities जळगाव गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात जागतिक दूरसंचार दिन उत्साहात

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात जागतिक दूरसंचार दिन उत्साहात


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाउंडेशनच्या गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे १७ मे रोजी जागतिक दूरसंचार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विभागांतर्गत टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विद्यार्थी संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचा विषय “डिजिटल लाइफ लाईन : स्ट्रेंगथनिंग रेसिलियन्स इन ए कनेक्टेड वर्ल्ड” असा होता. संपूर्ण कार्यक्रमात डिजिटल कनेक्टिव्हिटी, आधुनिक दूरसंचार तंत्रज्ञान आणि भविष्यातील संधी यावर प्रभावी चर्चा रंगली.

कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, अधिष्ठाता डॉ. तुषार कोळी तसेच विभागप्रमुख डॉ. हेमंत इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विभागातील प्राध्यापक वर्ग आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी दूरसंचार क्षेत्रातील बदलते तंत्रज्ञान, डिजिटल क्रांती आणि नव्या संशोधनाच्या संधी यावर सखोल मांडणी केली.

विद्यार्थ्यांनी दूरसंचार क्षेत्राचा इतिहास, 5G तंत्रज्ञान, उपग्रह संप्रेषण, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) आणि डिजिटल भविष्य या विषयांवर प्रभावी भाषणे सादर केली. मार्गेश वाघ, ऋतुजा ठेंग, यश धनगर, पावबा पाटील, प्राजक्ता पाटील, तुळजा महाजन आणि प्रणव थोरात यांनी दूरसंचार तंत्रज्ञानाच्या भविष्यावर विचारमंथन करत आधुनिक डिजिटल युगातील बदलांचे विविध पैलू उलगडले.

यावेळी बोलताना डॉ. हेमंत इंगळे यांनी दूरसंचार हे आधुनिक डिजिटल युगाचे बळकट आधारस्तंभ असल्याचे सांगितले. शिक्षण, आरोग्य, शेती आणि उद्योग क्षेत्रात दूरसंचार तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच विद्यार्थ्यांनी संशोधन, नवोपक्रम आणि स्टार्टअप्सच्या माध्यमातून या क्षेत्रात पुढे येण्याचे आवाहन केले.

प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना आधुनिक दूरसंचार तंत्रज्ञानाचे वाढते महत्त्व विशद केले. विद्यार्थ्यांनी संशोधन व नवोपक्रमाच्या माध्यमातून संस्थेसाठी उपग्रह निर्मितीसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर कार्य करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच 5G, वायरलेस कम्युनिकेशन, सॅटेलाइट टेक्नॉलॉजी, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) आणि आधुनिक दूरसंचार क्षेत्रातील करिअरच्या विविध संधींबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. “तंत्रज्ञानाच्या बळावर विद्यार्थी देशाच्या प्रगतीत मोलाचे योगदान देऊ शकतात,” असे प्रेरणादायी विचार त्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमातून केवळ दूरसंचार क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित झाले नाही, तर भविष्यातील टेलिकॉम क्षेत्रातील नेतृत्व घडवण्यासाठी हा एक दिशादर्शक मंच ठरला. डिजिटल समावेश, तंत्रज्ञान सक्षमीकरण आणि कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण झाली. आजच्या परस्परसंबंधित जगात गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय भविष्यातील डिजिटल भारतासाठी सक्षम अभियंते घडविण्यासाठी सातत्याने योगदान देत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

कार्यक्रमाचे नियोजन प्रा. आर. व्ही. पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन आणि आभार कीर्ती बोरोले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी कौतुक व्यक्त केले.


Protected Content

Play sound