पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील येथील गिरणाई शिक्षण संस्थेतर्फे ३१ डिसेंबर २०२२ ते २ जानेवारी २०२३ दरम्यान अमोलभाऊ शिंदे चषकचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची सुसंवाद साधण्यासाठी जागतिक कीर्तीची धावपटू मोनिका आथरे पाचोरा भेटीला येत आहे. अशी माहिती संस्थेचे सह सचिव प्रा. शिवाजी शिंदे यांनी दिली आहे.
पाचोरा शहरातील गिरणाई शिक्षण संस्थेतर्फे पाचोरा व भडगाव तालुक्यातील शालांतर्गत क्रीडापटूंना प्रोत्साहन देण्यासाठी अमोल भाऊ शिंदे चषकाचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य क्रीडा स्पर्धांचा उद्घाटन समारंभ ३१ डिसेंबर शनिवार रोजी सकाळी ९ वाजता शिंदे इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात संपन्न होणार आहे. युवक कल्याण व क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थितीत या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन होईल. याप्रसंगी खासदार उमेश पाटील यांचेसह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
आंतरराष्ट्रीय कीर्तीची धावपटू मोनिका आथरे याप्रसंगी उपस्थित राहणार आहे. विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय धावण्याच्या स्पर्धेत नैपुण्य दाखविलेल्या मोनिका आथरे हिला २०१७ – १८ चा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त आहे. २० व्या एशियन ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये तिने सातवा क्रमांक तर सिंगापूर येथे झालेल्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पाचवा क्रमांक पटकावला होता. वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये फुल मॅरेथॉन स्पर्धेत ४२.१९ किलोमीटर विक्रम आथरे यांच्या नावावर आहे.
आंतरराष्ट्रीय कीर्तीची धावपटू मोनिका आथरे ह्या दिंडोरी – नाशिक येथील रहिवासी असून पाचोरा व भडगाव तालुक्यातील शाळकरी मुलांचा उत्साह वाढविण्यासाठी त्या पाचोरा भेटीला येऊन उद्घाटन सत्रात उपस्थित होणाऱ्या सर्व शाळकरी क्रीडापटूंशी मुक्त संवाद साधणार आहेत. अशी माहिती गिरणाई शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रा. शिवाजी शिंदे यांनी दिली आहे.