जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । संशोधनाला सामाजिक, आर्थिक आाणि औद्योगिक उपयुक्ततेची जोड देवून संशोधनाची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था,पुणे यांच्या वतीने ७ ते १२ ऑगस्ट या कालावधीत उच्च संशोधन उपकरणे हाताळण्याबाबतची कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून या कार्यशाळेचे उद्घाटन करतांना प्रा. माहेश्वरी बोलत होते.
यावेळी मंचावर प्र-कुलगुरू प्रा.एस.टी. इंगळे या कार्यशाळेचे समन्वयक तथा भौतिकशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा.ए.एम. महाजन, प्रा.व्ही.व्ही. गिते आणि राज्य अध्यापक विकास संस्थेचे व्यवस्थापक प्रतिक धमाल उपस्थित होते. प्रा. माहेश्वरी म्हणाले की, विज्ञानातील संशोधन हे उपकरणाशी निगडीत असते. यातून संशोधनाला गती प्राप्त होते आणि संकल्पना स्पष्ट होतात. या कार्यशाळेमुळे अनेक उपकरणांचा अनुभव शिक्षकांना मिळणार आहे. आपल्याकडे संशोधनाची संख्या वाढत असली तरी गुणवत्ता मात्र घसरत चालली आहे. त्यामुळे करत असलेल्या संशोधनाला सामाजिक, आर्थिक आाणि औद्योगिक उपयुक्ततेची जोड देण्याची गरज आहे.
यावेळी प्रा. ए.एम. महाजन यांनी प्रास्ताविक करतांना कार्यशाळेची माहिती दिली. भौतिकशास्त्र प्रशाळेच्या वतीने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने तीस तासांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याची माहिती त्यांनी दिली. ‘फेब्रीकेशन ऑफ नॅनो-स्केल सेमीकंडक्टर डिवायसेस असे या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे नाव आहे. या प्रमाणपत्राच्या माहिती पत्रकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. प्रतिक धमाल यांनी राज्य अध्यापक विकास संस्थेच्या कामाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.गीते यांनी केले, डॉ. डी.जे. किरायत यांनी अभार मानले. या कार्यग्शाळेत महाराष्ट्रातील विज्ञान व तंत्रज्ञान विषयाचे चाळीस अध्यापक सहभागी झाले आहेत.