जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन जळगांव येथे विद्यार्थ्यांसाठी संवाद कौशल्ये व व्यक्तिमत्व विकास या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन २० व २१ नोव्हेंबर २०२३ रोजी करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक प्रा. रम्या कन्नन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, तंत्रनिकेतन समन्वयक प्रा.दीपक झांबरे, सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
प्रा. रम्या कन्नन विद्यार्थ्यांशी प्रथम दिवशी संवाद साधताना म्हणाल्या की, संवाद साधण्यासाठी आवश्यक असतं ते म्हणजे मनातील भीती घालवणे आणि याच भीतीमुळे आपण इतरांसोबत संवाद साधू शकत नाही. ती भीती घालवण्यासाठी आपण संवाद साधने महत्त्वाचे असते. त्याकरिता विद्यार्थ्यांनी इतरांचा विचार न करता किंवा मनात कुठलाही न्यूनगंड न ठेवता मनमोकळेपणाने आपल्याला आपलं मत ज्या भाषेत योग्य प्रकारे मांडता येते त्या भाषेत ते मांडावे. तसेच त्या म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी नेहमी संवाद साधताना कम्फर्ट झोनच्या बाहेर असणे गरजेचे आहे कारण जोपर्यंत आपण कम्फर्ट झोनच्या बाहेर येणार नाही, तोपर्यंत आपल्या मनात न्यूनगंड हा कायम राहतो ज्यामुळे आपण योग्यरीत्या संवाद साधू शकत नाही. त्याचप्रमाणे संवाद साधण्यासाठी विद्यार्थ्यांनी चांगले श्रोता असणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत आपल्याकडे ज्ञान नसेल तोपर्यंत आपण इतरांशी संवाद साधू शकत नाही, कारण जर तुमच्याकडे ज्ञान नसेल तुम्ही कुणाचं ऐकलेलं नसेल तर तुमच्या मनात समोरच्याशी बोलण्याविषयी भीती निर्माण होईल. म्हणून उत्तम संवाद साधण्यासाठी आपण ऐकणं सुद्धा महत्त्वाचं आहे. तसेच सांगणारा व ऐकणारा जर एकमेकांना समजून घेण्यास तयार असतील तर तो संवाद देखील यशस्वी संवाद म्हटला जातो. त्यानंतर त्यांनी काही कृती विद्यार्थ्यांकडून करवून घेतल्या व एक लेखी चाचणी देखील घेतली.
दुसर्या दिवशी च्या सत्रात व्यक्तिमत्व विकास व सादरीकरण कौशल्य यावर बोलत असताना त्या म्हणाल्या की, व्यक्तिमत्व विकासासाठी सर्वप्रथम आपण हर्ड मेंटॅलिटी मधून बाहेर येणे गरजेचे आहे, मी इतरांसारखाच न करता किंवा इतरांचं अनुकरण न करता मी माझं वैयक्तिक जीवन कसं चमकवता येईल यावर जर लक्ष दिलं तर निश्चितपणे आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होईल व आपली जी ख्यातीसुद्धा वाढेल. सुरुवातीला त्यांनी विद्यार्थ्यांकडून एकाग्रता व ध्येयनिश्चिती संबंधित एक छोटी क्टिविटी करवून घेतली व त्यानंतर व्यक्तिमत्व विकासासाठी एकाग्रता व ध्येय निश्चिती किती महत्त्वाची असते तसेच दैनंदिन दिनक्रम लिहिणे, ध्येय लिहिणे हे देखील आपल्या वैयक्तिक जीवनावर ते कसा परिणाम करते याबद्दल मार्गदर्शन केले. सादरीकरणासाठी जी संवाद कौशल्य व व्यक्तिमत्व साठी उपयुक्त असणारी मार्गदर्शक तत्वे जर आपण अंगी बांधलीत तर आपण एक उत्कृष्ट सादरकर्ते होऊ शकतो, असे देखील यावेळी त्या म्हणाल्या. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये व्यासपीठावर येण्याची हिंमत असावी किंबहुना असणं गरजेचं आहे असं मतही त्यांनी व्यक्त केलं.
त्यांनी विद्यार्थ्यांना व्यासपीठावर बोलवून काही विविध ऍक्टिव्हिटींच्या माध्यमातून त्यांच्याकडून सादरीकरण करून घेतले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या मनातील भीती घालवण्याचा त्याचप्रमाणे काही इतर बाबी ज्या व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक आहेत त्यावर देखील त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक वर्ग तथा शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुरज चौधरी यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. पवन भंगाळे यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील व सदस्या डॉ.केतकी पाटील यांनी कौतुक केले.