जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । देश-विदेशात ख्याती पसरलेले प्रख्यात लॅप्रोस्कोपिक ऑन्कोसर्जन डॉ.शैलेश पुणतांबेकर यांची कार्यशाळा आज डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात संपन्न झाली. या लाईव्ह डेमोस्टेशनचा दोनशेहून अधिक स्त्रीरोग तज्ञ, शल्यचिकित्सक यांना लाभ झाला असून ८ रुग्णांना त्यांच्याहातून अॅडव्हान्स तंत्र वापरुन शस्त्रक्रिया करण्याचा लाभ घेता आला.
गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शनिवार, २३ एप्रिल रोजी केईएम आणि पुण्यातील गॅलेक्सी केअर लॅप्रोस्कोपी इन्स्टिटयूट येथे सेवा देत असलेले सुप्रसिद्ध लॅप्रोस्कोपिक ऑन्कोसर्जन डॉ. शैलेश पुणतांबेकर यांच्या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
सर्वप्रथम प्रमुख अतिथी असलेले डॉ.शैलेश पुणतांबेकर, डॉ.अनिल पाटील, गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड यांच्याहस्ते धन्वंतरी पूजन करण्यात आले.
याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनच्या प्रेरणास्थान असलेल्या गोदावरी पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, डीएम कार्डियोलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील यांची विशेष उपस्थीती होती. यावेळी डॉ.उल्हास पाटील यांनी डॉ.पुणतांबेकर यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील कामाचा गौरव करुन काही वर्षापूर्वीही याचप्रकारे शस्त्रक्रिया करण्यात आलेल्याची आठवण सांगितली. याप्रसंगी डॉ.शैलैश पुणतांबेकर यांनीसुद्धा डॉ.उल्हास पाटील यांच्यासह रुग्णालय देत असलेल्या सेवेचा आदर करत येथील यंत्रणेबद्दलही समाधान व्यक्त केले.
कार्यशाळेच्या औपचारिक उद्घाटनानंतर डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अद्यावत ऑपरेशन थिएटर येथे लॅप्रोरोस्कोपी ऑन्कोसर्जन डॉ.शैलेश पुणतांबेकर यांनी स्वत: रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केली. याप्रसंगी ऑपरेशन थिएटरवर असलेल्या हॉलमध्ये त्याचे लाईव्ह डेमोस्टेशन दोन मोठ्या स्क्रीनवर दाखविण्यात आले. विशेष बाब अशी की, शस्त्रक्रियेदरम्यान डॉ.पुणतांबेकर हे त्याबद्दलची सविस्तर माहिती देत होते, याचा दुहेरी लाभ सहभागी डॉक्टर्सला झाला. याप्रसंगी अन्ननलिकेचा कॅन्सर, पित्ताशय थैलीचा कॅन्सर, सर्वायकल कॅन्सर, गर्भपिशवीचा कॅन्सर आदि शस्त्रक्रिया यावेळी करण्यात आल्यात. एकूण ८ शस्त्रक्रिया यावेळी करण्यात आल्यात. तसेच शस्त्रक्रिया सुरु असतांनाच डॉ.पुणतांबेकर यांना काही प्रश्न विचारले, त्याचेही त्यांनी तात्काळ निराकरण केले. तसेच शस्त्रक्रिया सुरु असतांना प्रारंभी स्त्रीरोग विभागातील रेसिडेंट डॉ.यशश्री देशमुख, डॉ.महेश देशमुख, सर्जरीचे डॉ.अनिश जोशी, डॉ.श्रीयश सोनवणे यांनी केसची माहिती दिली. यानंतर दुपारी मास्टर प्लान ऑन लॅप्रोस्कोपी पेल्विक प्रोसीजर यावर डॉ.शैलेश पुणतांबेकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यशाळेत सक्रीय सहभाग नोंदविल्याबद्दल सर्व सहभागींना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
यांचे लाभले सहकार्य –
या एकदिवस कार्यशाळेसाठी डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील नर्सिंग विभागाचे अनमोल सहकार्य लाभले. यात गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे संचालक शिवानंद बिरादर, मेट्रन संकेत पाटील, क्लिनिकल इंस्ट्रक्टर मनिषा खरात, किर्ती पाटील यांचा समावेश होता, तसेच प्रशासकीय अधिकारी एन.जी.चौधरी, आशिष भिरुड यांच्यासह नर्सेस, ओटी टिम आदिंनी परिश्रम घेतले. तसेच लाईव्ह डेमोस्टेशनसाठी मायटी ब्रदर्स यांचे सहकार्य लाभले. शस्त्रक्रियेसाठी ऑपरेशन थिएटर आणि तेथील साहित्याची सुस्थीतीत मांडणी करण्यात आली, त्याचे डॉ.शैलेश पुणतांबेकर यांनी कौतुक केले. याप्रसंगी रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ञ तसेच शस्त्रक्रिया विभागातील डॉक्टरांची उपस्थिती होती.