उमेदवार ठरवण्याचा अधिकार कार्यकर्त्यांना : आमदार चंद्रकांत सोनवणे


चोपडा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विजय मिळवायचा असेल, तर कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवर सक्षम, प्रामाणिक आणि जनतेशी नाळ असलेला उमेदवार द्यावा. उमेदवार ठरवण्याचा अधिकार हा कार्यकर्त्यांचाच आहे,” असे प्रतिपादन आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी केले. ते चोपडा येथे आयोजित शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

हा मेळावा १६ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता बोथरा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. या वेळी माजी आमदार लता सोनवणे, कृउबा सभापती नरेंद्र पाटील, प्रा. आत्माराम महाजन, सूर्यभान पाटील यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

या मेळाव्यात चहार्डीच्या लोकनियुक्त सरपंच चंद्रकला पाटील, माजी पंचायत समिती सदस्या सविता पाटील, माजी चोसाका संचालक निलेश पाटील, माजी राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष सचिन सोनवणे, राष्ट्रवादी शहराध्यक्षा स्वाती बडगुजर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या नव्या प्रवेशामुळे पक्ष संघटनेला ग्रामीण भागात बळ मिळणार असल्याचे आमदार सोनवणे यांनी नमूद केले.

सोनवणे म्हणाले की, “शिवसेना ही केवळ सत्तेसाठी नव्हे, तर जनसेवेसाठी कार्य करणारी विचारधारा आहे. पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने जनतेशी थेट संवाद साधत स्थानिक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा. स्थानिक स्वराज्य निवडणुका या कार्यकर्त्यांच्या ताकदीची खरी कसोटी असते.”

मेळाव्यादरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांनी पक्ष बांधणी आणि आगामी निवडणुकांबाबत ठोस रणनीती आखण्याचा निर्धार व्यक्त केला. या कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केले होते.

या मेळाव्यामुळे चोपड्यात शिवसेनेच्या संघटनात्मक हालचालींना नवे बळ मिळाले असून, आगामी स्थानिक निवडणुकीसाठी पक्षात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.