सर्वांच्या सहकार्याने चांगली कामगिरी पार पाडली-निंबाळकर
जळगाव प्रतिनिधी । नवनियुक्त जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी आज दुपारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्राधान्यक्रम ठरवून कामास प्रारंभ करणार असल्याची माहिती दिली. तर मावळते जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी सर्वांच्या सहकार्याने काम करता आल्याची भावना व्यक्त केली.
जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्या जागी अलीकडेच सोलापूर येथील महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे यांची नियुक्ती झाली होती. ते सोमवारी पदभार स्वीकारणार असल्याचेही घोषीत करण्यात आले होते. या अनुषंगाने आज दुपारी ढाकणे यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. याप्रसंगी मावळते जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी जिल्हाधिकारीपदाची सूत्रे अविनाश ढाकणे यांना सोपविली. ढाकणे यांनी आपल्याला जळगावबद्दल प्राथमिक माहिती असली तरी येथील सर्व अडचणी आणि प्रश्न जाणून घेऊन यातील प्राधान्यक्रम ठरवणार असल्याची माहिती ढाकणे यांनी दिली. आधी काम करणार्या ठिकाणचा प्राधान्यक्रम वेगळा होता. मात्र जळगावबाबत सर्व माहिती घेऊन कामांना प्रारंभ करणार असल्याचे ते म्हणाले.
किशोरराजे निंबाळकर म्हणाले की, मला सुमारे दोन वर्षे कार्यकाळ मिळाला. यातील १८ महिने मला आयुक्तपदाचा कार्यभारदेखील मिळाला. या कालखंडात मी अनेक कामांना गती दिल्याचे प्रतिपादन निंबाळकर यांनी केले. विशेष करून स्वच्छता मोहिम, अतिक्रमण आदींचा त्यांनी खास उल्लेख केला. याशिवाय, जिल्ह्यातील विविध समस्या सोडविण्याला आपण प्राधान्य दिले असल्याची माहिती त्यांनी दिली. यासाठी सर्व लोकप्रतिनिधींसह सर्व लोकप्रतिनिधींचे आपल्याला सहकार्य लाभल्याचेही निंबाळकर म्हणाले.
पहा– आजी-माजी जिल्हाधिकारी नेमके काय म्हणालेत ते !