Home प्रशासन जिल्हा परिषद जलकुंभाचे काम रखडले; ग्रामस्थ दोन वर्षांपासून प्रतीक्षेत !

जलकुंभाचे काम रखडले; ग्रामस्थ दोन वर्षांपासून प्रतीक्षेत !


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील चितोडा गावासाठी शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीतून उभारले जात असलेल्या जलकुंभाचे काम मागील दोन वर्षांपासून रखडले आहे. भविष्यात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईच्या संकटावर मात करण्यासाठी या जलकुंभाचे बांधकाम लवकर पूर्ण होण्याची प्रतीक्षा ग्रामस्थ करत आहेत, मात्र कामाची गती अत्यंत धीम्या गतीने होत असल्याने ते त्रस्त झाले आहेत.

राज्य शासनाच्या जिल्हा परिषद विभागामार्फत चितोडा ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी जलजीवन मिशन योजनेंतर्गत सुमारे ७६ लाख रुपये खर्चून जलकुंभाची उभारणी आणि गावापासून सुमारे ७ किलोमीटर दूर असलेल्या वड्री धरणातून जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, हे काम अत्यंत ধिमी गतीने सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या कामाची सध्याची गती पाहता, ते पूर्ण होण्यासाठी आणखी काही वर्षे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित विभागाचे अधिकारी यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने आणि ठेकेदाराच्या निष्काळजी कार्यपद्धतीमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आणि संतापाचे वातावरण आहे. सरपंच अरुण पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी सांगितले की, गावातील पाण्याची टाकी आणि जलकुंभाचे काम अपूर्ण आहे. हे काम जलद गतीने पूर्ण व्हावे यासाठी ग्रामस्थ स्थानिक कार्यालयात वारंवार चकरा मारून थकले आहेत. मात्र, अधिकारी आणि ठेकेदार ‘आम्ही करतो, उद्या करू’ असे केवळ आश्वासन देऊन लोकांची दिशाभूल करत असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. चितोडा गावाला पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर असून, जलकुंभाचे काम लवकर पूर्ण न झाल्यास भविष्यात मोठे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


Protected Content

Play sound