जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जळगाव शहरात महिलांसाठी एका विशेष आणि बहुआयामी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वप्न साकार फाउंडेशन संचलित ‘अग्निशिखा महिला ग्रुप’ च्या वतीने जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा स्वरूपाचा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्षा भारती काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. हा कार्यक्रम येत्या २२ मार्च रोजी जळगाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडणार आहे. अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.
आरोग्य आणि सायबर सुरक्षेवर विशेष भर
आजच्या धावपळीच्या युगात महिलांचे आरोग्य आणि सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे. या कार्यक्रमात महिलांच्या आरोग्याशी संबंधित समस्या, विशेषतः मासिक पाळी आणि इतर शारीरिक व्याधींवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच, वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि सोशल मीडियाचा वापर करताना महिलांनी कोणती काळजी घ्यावी, यावरही विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहे.

व्यसनमुक्तीचा जागर आणि सन्मान सोहळा :
समाजातील वाढती व्यसनाधीनता रोखण्यासाठी या कार्यक्रमात ‘व्यसनमुक्तीपर जाहीर कीर्तन’ होणार आहे. या माध्यमातून जनजागृतीचा संदेश दिला जाईल. विशेष म्हणजे, जनसेवेत सदैव तत्पर असणाऱ्या जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, परिचारिका आणि डॉक्टरांचा यावेळी विशेष गौरव करण्यात येणार आहे.
‘खान्देश रत्न’ पुरस्कारांचे वितरण :
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना यावेळी ‘खान्देश रत्न’ पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. यात डॉ. निलेश चांडक, डॉ. सीमा पाटील, डॉ. पूजा सोमानी, डॉ. प्राची महाजन, डॉ. नितीन विसपुते, डॉ. अविनाश खेलवाडे, प्रा. वासुदेव पाटील, डॉ. श्रद्धा राणे, डॉ. शीतल पाटील, सौ. जागृती येवले, सीए तृप्ती कांकरिया, सौ. युगंधरा सोळुंके, डॉ. अवधूत चौधरी आणि डॉ. रुकसाना खान यांचा समावेश आहे.



