जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रिक्षा व्यवसायात येऊ इच्छीणार्या महिलांना नोंदणीसह अन्य शुल्कात सवलत देण्यात यावी अशी मागणी मनसेचे नेते जमील देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मनसेचे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठविले आहे. यात म्हटले आहे की, राज्यात अबोली रिक्षाच्या (पिंक आटो) माध्यमातून अनेक महिला नवीन अबोली रिक्षा घेऊन प्रवासी रिक्षा वाहतूक या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात येत आहे. महिलांना नवीन रिक्षा घेण्याकरता राज्यातील अनेक सामाजिक संस्था मदत करत असून राज्यातील सहकारी बँका व राष्ट्रीयकृत बँका अर्थसहाय्य देखील करत आहेत. राज्यातील महिलावर्ग आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्याकरता प्रवासी रिक्षा वाहतूक व्यवसाय उत्तम पर्याय म्हणून समोर येत आहे. महिलांचाही याकडे कल वाढत आहे. प्रवासी रिक्षा व्यवसाय करताना महिला सुरक्षित प्रवासी वाहतूक करून चांगले उत्पन्न मिळवत आहे. मुली आणि महिला यांचा सुरक्षित प्रवास व्हावा या दृष्टीने सुद्धा पिंक आटो चांगला पर्याय आहे.
यात पुढे नमूद केले आहे की, रिक्षा व्यवसायात येणार्या महिला या आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या परिवारातून येत आहे. रिक्षा घेण्याकरता बँकेकडून ८५ टक्के अर्थसहाय्य करण्यात येते. मात्र आगाऊ १५ टक्के रक्कम जमवणे अशा महिलांना जिकरीचे होते. त्यातच कच्चा परवाना, पक्का परवाना, वाहनकर असा साधारण वीस हजार रुपये वेगळा खर्च येतो.अशा महिलांना प्रोत्साहन म्हणून नोंदणी शुल्क, वाहनकर शुल्क, कच्चा परवाना शुल्क, पक्का परवाना शुल्क शासनाने माफ करावा जेणेकरून महिला सक्षमीकरण चे खरे कार्य राज्यात उभे राहील.
यात शेवटी म्हटले आहे की, ८ मार्च २०२३ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त या बाबत घोषणा महाराष्ट्र शासनाने करावी व येणार्या अर्थसंकल्पात याबाबतची आर्थिक तरतूद करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.