Home क्रीडा महिलांनी क्रीडा क्षेत्रात पुढे यावे : मंत्री रक्षाताई खडसे

महिलांनी क्रीडा क्षेत्रात पुढे यावे : मंत्री रक्षाताई खडसे


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी  | जागतिक महिला दिनानिमित्त महिलांमध्ये क्रीडाविषयी जागरूकता निर्माण व्हावी तसेच शहरी व ग्रामीण भागातील महिलांना क्रीडा क्षेत्रात अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘अस्मिता लीग’चे उद्घाटन केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले. यावेळी महिलांनी क्रीडा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विभागीय क्रीडा संकुल मैदानावर महिलांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान मंत्री खडसे यांनी सायकल स्पर्धा आणि वॉकेथॉन स्पर्धेला झेंडा दाखवून स्पर्धांचा शुभारंभ केला. या प्रसंगी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या संचालिका डॉ. मोनिका घुगे, जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील, फिट इंडिया ॲम्बेसेडर व बॉडीबिल्डर विक्रम जाधव तसेच क्रीडा विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने महिला खेळाडू उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना मंत्री खडसे म्हणाल्या की, देशाला 2036 पर्यंत विकसित भारत बनविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबतच नागरिकांचे शारीरिक आरोग्यही तेवढेच महत्त्वाचे आहे. युवा पिढीने स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. विविध खेळांच्या माध्यमातून युवक-युवतींना तंदुरुस्त ठेवता येते आणि निरोगी व सक्षम युवा पिढीमुळे देश विविध क्षेत्रांत प्रगती करू शकतो.

त्यांनी पुढे सांगितले की, क्रिकेटसह अनेक क्रीडा प्रकारांमध्ये उज्ज्वल भविष्य आहे. पालकांनी मुलांना खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. ‘खेलो इंडिया’ उपक्रमांतर्गत महिला दिनाचे औचित्य साधून देशभरातील विविध जिल्ह्यांमध्ये ‘अस्मिता लीग’चे आयोजन करण्यात येत आहे. या माध्यमातून महिलांना विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. क्रीडा क्षेत्रात खेळाडू म्हणूनच नव्हे, तर प्रशिक्षक, व्यवस्थापन आणि इतर अनेक करिअरच्या संधी उपलब्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले. ग्रामीण भागातील खेळाडूंना अधिक संधी मिळाव्यात यासाठी शासन विविध सुविधा उपलब्ध करून देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय स्तरावर विविध क्रीडा प्रकारांमध्ये यश संपादन केलेल्या मुलींचा मंत्री खडसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्ह्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा क्षेत्रात विविध सेवा व सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे सांगितले. तसेच स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या संचालिका डॉ. मोनिका घुगे यांनी महिलांनी क्रीडा क्षेत्रात पुढे यावे यासाठी संस्था मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असल्याचे नमूद केले.

कार्यक्रमाला महिला खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून क्रीडा क्षेत्रात महिलांचा वाढता सहभाग हे सकारात्मक चित्र असल्याचे उपस्थितांनी व्यक्त केले.


Protected Content

Play sound