पाळधी, ता. धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथून जाणार्या महामार्गावरून जाणारी लक्झरी बस उलटून झालेल्या अपघातात ३० पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले असून यात एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे.
या संदर्भात मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, अकोला येथून अहमदाबाद येथे जाण्यासाठी जीजे १८ बीव्ही-३०४४ या क्रमांकाची लक्झरी बस निघाली होती. ही बस जळगावहून प्रवाशांना घेऊन पुढील प्रवासासाठी निघाली.
दरम्यान, संबंधीत लक्झरी बस ही पाळधी जवळच्या हॉटेल सुगोकीच्या जवळ अचानक पलटी झाली. या अपघातामध्ये ३० पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. यातील बहुतांश प्रवाशांना किरकोळ जखमा आहेत. तर यापैकी एक महिलेस गंभीर इजा झाली असून तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात नेमका कसा झाला ? याची माहिती मिळाली नसली तरी महामार्गावरील वळणाचा चालकाला अंदाज न आल्याने बस बाजूच्या खोलगट भागात कोसळल्याचे समजते.
या अपघातात अनेक प्रवासी जखमी झालेले आहेत. या जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी झालेले बहुतांश प्रवासी हे अकोला व काही जळगाव येथील असल्याचे समजते. अपघाताची माहिती मिळाल्याबरोबर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी अपघातस्थळ गाठून जखमींची विचारपूस करत त्यांना उपचारासाठी मदत केली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या संदर्भात पाळधी दूरक्षेत्र पोलीस स्थानकात नोंद करण्याचे काम सुरू होते.