जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव ते ममुराबाद रोडवरील चिंचोली हद्दीजवळ दुचाकीसमोर अचानक कुत्रे आल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या महिला गंभीर जखमी झाल्याची घटना ९ नोव्हेंबर रोजी घडली आहे. या प्रकरणी गुरूवारी १३ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता जखमी महिलेच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कविता गोकुळ पाटील (वय २६, रा. चिंचोली, ता. यावल) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास त्या गोकुळ गुलाब पाटील (रा. चिंचोली) यांच्या MH-१९-ES-१६४३ या क्रमांकाच्या दुचाकीवर पाठीमागे बसून जळगाव ते ममुराबाद रोडने जात होत्या. यावेळी आरोपी मोटारसायकल चालकाने अतिशय भरधाव वेगात व निष्काळजीपणे वाहन चालवले. समोर अचानक कुत्रा आल्याने त्याला धडक बसून दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात फिर्यादी कविता पाटील या दुचाकीवरून खाली पडल्या आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

याप्रकरणी गुरूवारी १३ नोव्हेंबर रोजी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार दुचाकी चालकाविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेका प्रदीप राजपुत हे करीत आहेत.



