मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विरारमध्ये एका विवाहित महिलेची गळा दाबून हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी मध्यरात्री विरार पोलिसांनी महिलेच्या प्रियकाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
धनश्री आंबडस्कर ही महिला रुपेश आंबडस्कर तसेच नेत्रा आणि नव्या या दोन लहान मुलींसह विरार पश्चिमेच्या फुलपाडा येथील साईनाथ अपार्टमेंटमध्ये राहत होती. सोमवारी सकाळी तिचा पती रूपेश कामावर गेला होता, तसेच दोन मुली शाळेत गेल्या होत्या. दुपारी धनश्रीची तब्येत बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दुपारी तिचा प्रियकर शेखर कदम हा तिला भेटायला घरी आला होता. दोघांमध्ये वाद निर्माण झाला त्यावेळी कदम याने गळा दाबून धनश्रीची हत्या केली, असा आरोप मयत धनश्रीचा पती रूपेश याने केला आहे. या प्रकरणी रात्री उशिरा विरार पोलिसांनी आरोपी कदम याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.