मुंबई (वृत्तसंस्था) केंद्रातील भाजप-शिवसेना युती तुटल्यात जमा झाली आहे. दुसरीकडे सरकार स्थापण्यासाठी राज्यपालांनी दिलेल्या निमंत्रणानुसार आज राष्ट्रवादी कॉंग्रेस सरकार स्थापण्याचा दावा करणार का?, याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. अर्थात, यासाठी शिवसेनेला पाठिंब्याकरिता राजी करावे लागेल. त्यामुळे राज्यातील सत्ता स्थापनेबाबतचा पेच कायम असल्याचे चित्र आहे.
सोनिया गांधी, ए. के. अँटनी, अंबिका सोनी, के. सी. वेणुगोपाळ या नेत्यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून विरोधाची भूमिका घेतल्याचे समजते. ठरल्याप्रमाणे शिवसेनेला सत्तेत सामावून घेण्याची भूमिका काँग्रेसला घ्यावीच लागेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे असून आज, मंगळवारी याबाबत शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यातील चर्चा निर्णायक ठरणार आहे. सोमवारची काँग्रेसची भूमिका काहीशी नकारात्मक असली तरी शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया संपुष्टात आलेली नसून ती जिवंत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सोमवारी उद्धव ठाकरे यांनी शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली आणि त्यांच्या पक्षांकडून समर्थनाचे पत्र मिळाले नसतानाही शिवसेनेने राज्यपालांची भेट घेऊन सत्तेचा दावा केला. शिवसेनेने ६३ आमदारांच्या समर्थनाचे पत्र राज्यपालांना सादर केले असून आज, मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसही ५४ हून अधिक आमदारांच्या समर्थनाचे पत्र सादर करताना शिवसेनेला पाठिंबा देण्याची शक्यता आहे.