घुसखोरांना देशात राहू देणार नाही – शहा

amit shaha

कोलकाता, वृत्तसंस्था | देशातील प्रत्येक राज्यात आम्ही राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि नागरिक (संशोधन) विधेयक २०१९ घेऊन येणार असल्याचे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज ममता बॅनर्जी यांच्या पश्चिम बंगालमध्ये केले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एनआरसीला कडाडून विरोध केलेला असताना आज अमित शहा यांनी कोणत्याही परिस्थितीत हे विधेयक घेऊन येणार असून घुसखोरांना देशात राहू देणार नसल्याचे सांगितल्याने भापज विरुद्ध तृणमूल काँग्रेस यांच्यात पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

केंद्रीय गृहमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा अमित शाह हे पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आले आहेत. शाह यांनी राजधानी कोलकातामध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि नागरिक (संसोधन) विधेयक २०१९ च्या सेमीनारला संबोधित केले. पश्चिम बंगाल आणि कलम ३७० यांच्यात एक विशेष संबंध आहे. कारण श्यामा प्रसाद मुखर्जी हे याच भूमीतील पूत्र आहेत. ज्यांनी या ठिकाणी ‘एक देश, एक संविधान’ ही घोषणा दिली होती. याच बंगालमधून डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी घोषणा केली होती की, एका देशात दोन प्रधान, दोन विधान आणि दोन संविधान चालणार नाहीत. भारत मातेच्या या महान सुपुत्राला अटक करण्यात आली होती. व त्यानंतर त्यांचा रहस्यरित्या मृत्यू झाला होता, असेही शहा यावेळी म्हणाले.

श्यामा प्रसाद मुखर्जी हे शहीद झाल्यानंतर काँग्रेसला वाटले की, प्रकरण आता संपले आहे. परंतु, त्यांना माहिती नव्हते की, आम्ही भाजपवाले आहोत. कोणालाही एकदा पकडले की, त्याला कधीच सोडत नाही. आपण यावेळी भाजपचे सरकार बनवले आहे. त्यामुळे आम्ही झटक्यात कलम ३७० रद्द केले आहे. एनआरसी मुद्द्यावर बोलताना शहा म्हणाले, मी आत्ताच स्पष्ट करू इच्छितो की, आम्ही एनआरसी घेऊन येत आहोत. त्यानंतर भारतात एकही घुसखोर राहणार नाही. आम्ही त्यांना कोणत्याही परिस्थितीत बाहेर काढू, असेही ते म्हणाले. भाजप सरकार सर्वात आधी म्हणजे एनआरसीच्या आधी नागरिक सुधारणा विधेयक आणणार आहे. या विधेयकांतर्गत जितके हिंदू, शीख, बौद्ध, जैन, ईसाई निर्वासित म्हणून भारतात आले आहेत. त्यांना कायमचे भारताचे नागरिकत्व बहाल करून दिले जाणार आहे.

Protected Content