महाराष्ट्राला ‘तौत्के’ चक्रीवादळाचा तडाखा बसणार ?

नवी दिल्ली, वृत्तसंस्था  । ‘तौत्के’ चक्रीवादळाचा तडाखा गुजरातसह महाराष्ट्रालाही बसणार असल्याचा इशारा देण्यात आलेला आहे.  

दक्षिण पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेलं ‘तौत्के’ चक्रीवादळ  समुद्रातून  गुजरातच्या दिशेनं सरकण्यास सुरूवात झाली आहे.  हे वादळ येत्या काही तासांत कोकण किनारपट्टीवर धडकणार आहे, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यातील उवर्रित भागातही याचा परिणाम दिसून येणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे आता चक्रीवादळात रुपांतर झालं आहे. चक्रीवादळ संभाव्य मार्गाने गुजरातच्या दिशेने जात असताना १५ ते १७ मे दरम्यान ते महाराष्ट्र किनारपट्टीला समांतर जाणार आहे. प्राथमिक अंदाजानुसार चक्रीवादळाचा संभाव्य मार्ग ओमानच्या दिशेने होता. त्यामुळे महाराष्ट्र किंवा गुजरातला त्याचा फटका बसणार नसल्याचे दिसून येत होते. मात्र, सध्याच्या अंदाजानुसार चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीकडे जाण्याचे संकेत आहेत. त्यामुळे ते समुद्रात महाराष्ट्राच्या किनारपट्टीजवळ असेल. परिणामी किनारपट्टीच्या भागात ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने वादळी वारे आणि अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

 

Protected Content