जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पतीच्या विवाह बाह्य संबंधाला विरोध केल्याच्या कारणावरून पतीकडून पत्नीला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. यामध्ये पत्नीच्या डोक्याला टाके पडले असून उजवा हात फ्रॅक्चर झाला असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही घटना गुरूवार ४ जुलै रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अयोध्या नगरात घडली. याप्रकरणी शनिवारी ६ जुलै रोजी दुपारी ३ वाजता एमआयडीसी पोकलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अयोध्या नगरात ३२ वर्षीय विवाहिता आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. विवाहितेच्या पतीचे विवाहबाह्य संबंध असून याबाबत विवाहितेला माहीत झाले. विवाहितेने पतीच्या विवाहबाह्य संबंधाला विरोध केला असता, त्याचा राग आल्याने गुरूवार ४ जुलै रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास संशयित पतीने पत्नीला शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी लोखंडी रॉड विवाहितेच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. तसेच मारहाणीत विवाहितेचा हात देखील फ्रॅक्चर झाला आहे.
मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या विवाहितेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. विवाहितेने दिलेल्या जबाबावरुन शनिवारी ६ जुलै रोजी दुपारी ३ वाजता संशयित पतीविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी हे करीत आहे.