विरार रेल्वे स्थानकांवर पतीने केला पत्नीवर चाकूने प्राणघातक हल्ला

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विरार रेल्वे स्टेशनवरील दक्षिण बाजूच्या फ्लाओव्हर ब्रिजवर एका २७ वर्षीय महिलेवर तिच्या पतीने चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिवा शर्मा असे हल्लेखोर पतीचे नाव आहे. या हल्ल्यात महिलेच्या गळ्यावर आणि हातावर गंभीर दुखापत झाली आहे. हल्ला झाल्यानंतर या ठिकाणी काही काळ एकच गोंधळ उडाला होता. मात्र काही सतर्क नागरिकांनी तत्काळ हल्लेखोराला अडवल्यामुळे महिलेचा जीव वाचला. घटनेची माहिती मिळतात तत्काळ आरपीएफने हल्लेखोराला पकडून जीआरपीच्या ताब्यात दिले. तर जखमी महिलेला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पती-पत्नीच्या कौटुंबिक वादातून हल्ला झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सकाळी सात वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.

सकाळच्या वेळी विरार रेल्वे स्थानकात कामावर जाण्यासाठी चाकरमान्यांची मोठी गर्दी असते. या गर्दीच्या वेळी विरार रेल्वे स्थानकावरील ब्रिजवर शिवा शर्मा याने त्याची पत्नी वीरशिला शर्मा हिच्यावर मागून येत धारदार चाकूने वार केला होता. त्यानंतर लागलीच चाकू तिच्या पोटात खुपसण्याच्या प्रयत्नात असताना वीरशिला हिने चाकू पकडला. त्यानंतर आजूबाजूला जमलेल्या प्रवाशांनी तत्काळ शिवाला पकडले. त्यामुळे पुढील अनर्थ टाळला. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या आरपीएफने आरोपीला ताब्यात घेतले. तसेच जखमी वीरशिला हिला तत्काळ जवळ असलेल्या संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले अजून तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

Protected Content