मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | वाढदिवसाचा केक उशीरा आणल्यामुळे झालेल्या वादातून साकीनाका येथे ४५ वर्षीय व्यक्तीने पत्नी व मुलावर चाकूने हल्ला केल्याची घटना रविवारी साकीनाका परिसरात घडली. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी आरोपी राजेंद्र शिंदेविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. जखमी पत्नी व मुलावर घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
साकीनाका येथील अशोक नगरमधील वेल्फेअर सोसायटी गल्ली क्रमांक ३ मध्ये रविवारी ही घटना घडली. राजेंद्र शिंदे याचा रविवारी वाढदिवस होता. कुटुंबियांनी उशीरा केक आणल्यामुळे ते संतापले होते. त्यावरून त्यांनी पत्नी रंजना शिंदे यांच्यासोबत वाद घालण्यास सुरूवात केली. वडील आईला शिवीगाळ करीत असल्याचे पाहताच मुलाने वडिलांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राजेंद्र शिंदे यांनी घरातील चाकूने मुलाच्या मनगटावर वार केला. त्यानंतर त्याने रंजना शिंदे यांच्यावरही वार केले. मुलगामध्ये आला असता त्याच्याही पोटावर चाकू मारला. या घटनेनंतर दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपाचार सुरू आहेत. रविवारी पोलिसांनी याप्रकरणी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.