अखेर पीआय किरणकुमार बकालेंच्या विरोधात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आक्षेपार्ह टिपण्णीमुळे वादाच्या भोवर्‍यात सापडून निलंबीत झालेले पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांच्या विरोधात अखेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठा समाजाच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह टिपण्णीची दखल घेऊन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी एलसीबीचे प्रमुख निरिक्षक किरणकुमार बकाले यांची मंगळवारी रात्री उशीरा बदली केली होती. दरम्यान, काल दिवसभरात मराठा समाजातील मान्यवरांसह सर्वसामान्यांनी या प्रकरणी आक्रमक पवित्रा घेत बकाले यांच्या निलंबनासह कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यात प्रामुख्याने आमदार मंगेश चव्हाण, आमदार चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवीद्रभैय्या पाटील, विनोद देशमुख आदी मान्यवरांचा समावेश होता. याबाबत एसपींकडे मागणी देखील करण्यात आली होती.

या अनुषंगाने काल रात्री उशीरा जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी किरणकुमार बकाले यांच्या निलंबानाचे आदेश काढले आहेत. तसेच जिल्ह्यात त्यांच्यामुळे वातावरण तापले असल्याने त्यांना जळगाव सोडण्याचे देखील सांगण्यात आले होते. दरम्यान, आज दिवसभर जिल्ह्यात या प्रकरणाचे मोठ्या प्रमाणात पडसाद उमटले. मराठा समाजाने ठिकठिकाणी याबाबत आक्रमक भूमिका घेतली. याची दखल घेऊन अखेर सायंकाळी जिल्हापेठ पोलीस स्थानकात किरणकुमार बकाले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा भादंवि कलम १५३, १५३ अ, २९४,१६६, ५०९ आणि ५०० अन्वये दाखल करण्यात आला आहे.

Protected Content