मविआ अल्पमतात; उध्दव ठाकरेंनी राजीनामा द्यावा ! : दीपक केसरकर

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेनेच्या दोन तृतीयांश आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठींबा काढला असून हे सरकार अल्पमतात आले आहे. यामुळे आता उध्दव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी एकनाथ शिंदे समर्थक आमदार दीपक केसरकर यांनी केली आहे.

आज राज्याच्या राजकारणातील निर्णायक दिवस ठरण्याच्या दृष्टीने अनेक महत्वाच्या घटना घडणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. यात विशेष करून एकनाथ शिंदे यांच्या गटातर्फे सुप्रीम कोर्टात दोन याचिकांवर सुनावणी सुरू करण्यात आलेली आहे. यातील एका याचिकेमध्ये एकनाथ शिंदे यांनी आपण तसेच शिवसेनेच्या अन्य ३८ आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठींबा काढला असल्याचा दावा केला आहे.

दरम्यान, या संदर्भात माजी मंत्री तथा एकनाथ शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी टिव्ही नाईन या वृत्तवाहिनीला दूरध्वनीवरून दिलेल्या मुलाखतीत राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे अल्पमतात आल्याचा दावा केला आहे. आपण या संदर्भात लवकरच राज्यपालांना पत्र लिहणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर आपण पत्र लिहणार असून यामुळे नवीन सरकार हे सत्तारूढ होणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. याप्रसंगी त्यांनी नवीन सरकार हे बहुमत सिध्द करणार असल्याचे देखील नमूद केले. तर लवकरच चित्र स्पष्ट होणार असल्याचा दावा देखील केला आहे.

Protected Content