Home Cities भुसावळ भुसावळ तालुक्यात ‘अँब्लियोपिया’विरोधात व्यापक जनजागृती 

भुसावळ तालुक्यात ‘अँब्लियोपिया’विरोधात व्यापक जनजागृती 


भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । लहान वयातच दृष्टीदोष ओळखून त्यावर वेळेत उपचार केल्यास भविष्यातील गंभीर समस्या टाळता येतात, या उद्देशाने भुसावळ तालुक्यात “अँब्लियोपिया” (आळशी डोळा) या विकाराबाबत व्यापक जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित या उपक्रमाला शिक्षण व आरोग्य क्षेत्रातून मोठा प्रतिसाद मिळाला.

शहरातील पुंडलिक गणपत बऱ्हाटे माध्यमिक विद्यालय येथे आयोजित कार्यक्रमात तालुक्यातील सर्व शासकीय, खाजगी व निमखाजगी शाळा तसेच शासकीय रुग्णालयांना “दूरदृष्टी तपासणी चार्ट”चे वितरण करण्यात आले. प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनीताई सावकारे यांच्या पुढाकारातून आणि मा. ना. संजय सावकारे यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम साकारण्यात आला. कार्यक्रमास तालुका शिक्षण अधिकारी किशोर वायकोळे, शिक्षण सभापती राजेंद्र आवटे, नगरसेवक परीक्षित बऱ्हाटे, शिक्षण विस्तार अधिकारी बी.डी. धाडी, तुषार प्रधान, भाजप अध्यक्ष संदीप सुरवाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना रजनी सावकारे यांनी प्रतिबंधात्मक तपासणीचे महत्त्व अधोरेखित केले. लहानपणी वेळेवर दृष्टी तपासणी केल्यास मुलांमध्ये निर्माण होणारा न्यूनगंड टाळता येतो आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो, असे त्यांनी सांगितले. अँब्लियोपिया हा लहान मुलांमधील एक महत्त्वाचा दृष्टीदोष असून मेंदू आणि डोळ्यांमधील समन्वय कमी झाल्यामुळे एका डोळ्याची दृष्टी कमजोर होते. बाह्यतः डोळा सामान्य दिसत असला तरी स्पष्ट दिसत नाही, ही या विकाराची प्रमुख लक्षणे आहेत.

या उपक्रमांतर्गत संपूर्ण भुसावळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, खाजगी व निमखाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये “व्हिजन टेस्टिंग चार्ट”चे वितरण करण्यात आले. तसेच शहर व तालुक्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्येही हे चार्ट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. चार्टमध्ये मराठी, इंग्रजी अक्षरे, डॉट आणि ‘सी’ प्रकार तसेच लहान मुलांसाठी प्राण्यांची चित्रे समाविष्ट करण्यात आली आहेत.

शाळांमध्ये हे चार्ट कायमस्वरूपी लावण्यात येणार असून शिक्षक विद्यार्थ्यांची नियमित दृष्टी तपासणी करतील. सहा मीटर अंतरावर विद्यार्थ्यांना उभे करून एक डोळा बंद करून चार्टवरील अक्षरे वाचण्यास सांगितले जाईल आणि त्यानंतर दुसऱ्या डोळ्याचीही तपासणी केली जाईल. जर विद्यार्थ्यांना अक्षरे वाचताना अडचण आली, तर त्यांच्या पालकांना नेत्रतज्ज्ञांकडून पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या उपक्रमाची सविस्तर माहिती डॉ. नितु पाटील यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चैताली चौधरी व तुषार चिंधडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन हेमांगी चौधरी यांनी केले.

रजनी सावकारे यांनी सांगितले की, अँब्लियोपिया पूर्णपणे टाळता येत नसला तरी लवकर निदान आणि वेळेत उपचारांमुळे कायमस्वरूपी दृष्टीहानी टाळता येते. नियमित डोळ्यांची तपासणी हेच सर्वात प्रभावी प्रतिबंधात्मक साधन आहे. या उपक्रमामुळे भविष्यात भुसावळ तालुका अँब्लियोपिया मुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

डॉ. नितु पाटील यांनी हा उपक्रम राज्यात पहिल्यांदाच भुसावळ तालुक्यात राबविण्यात येत असल्याचे सांगितले. संजय सावकारे यांच्या दूरदृष्टीतून साकारलेला हा “सावकारे पॅटर्न” भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रात विस्तारेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर तालुका गटशिक्षण अधिकारी किशोर वायकोळे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उत्तम दृष्टी अत्यावश्यक असल्याचे नमूद केले.


Protected Content

Play sound