जळगाव प्रतिनिधी | शासनाविरुद्ध पुकारलेल्या त्रिस्तरीय आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात पेन्शन संघर्ष यात्रा आज जळगावात आली असता सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवन जळगाव येथे पेन्शन संघर्ष यात्रेचे जोरदार स्वागत व मेळावा संपन्न झाला. यावेळी शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीने जोर धरला.
जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी जुनी पेन्शन संघटनाच्या माध्यमातून जवळपास 60 विविध संघटनांनी एकत्रित येत जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समिती तयार केली.संघर्ष समितीने शासनाविरुद्ध पुकारलेल्या त्रिस्तरीय आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात मुंबई ते सेवाग्राम वर्धा पेन्शन संघर्ष यात्रा आज जळगावात आली असता सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवन जळगाव येथे पेन्शन संघर्ष यात्रेचे जोरदार स्वागत व मेळावा संपन्न झाला.
यावेळी जुनी पेन्शन हा प्रत्येक कर्मचाऱ्याचा अधिकार असून शेअर बाजार आधारीत NPS/DCPS पेन्शन योजनेच्या ताब्यात कर्मचाऱ्यांचे भविष्य देण्यास राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांचा तीव्र विरोध आहे. सर्व संवर्गाच्या सरकारी अधिकारी, कर्मचारी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना संघर्ष यात्रेत सहभागी असून राज्य शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करावी. खासदार, आमदारांना जुनी पेन्शन, कर्मचाऱ्यांनाच का नाही? असा सवाल जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र राज्यअध्यक्ष वितेश खांडेकर यांनी पेन्शन संघर्ष मेळाव्यात केला.
याप्रसंगी उपस्थित सर्व पदाधिकारी यांनी सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू व्हावी हा कर्मचार्यांचा हक्क आहे. १ नोव्हेंबर २००५ पासून सरकारने कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना बंद करून त्यांचे भविष्य अंधकारमय केले आहे. अनेक कर्मचारी राज्यांमध्ये दरम्यानच्या काळात मृत झालेले आहेत त्यांची कुटुंब मरण यातना सोसत आहेत पण सरकार त्यांना कोणतीही मदत करत नाही. नोकरीची तीस वर्ष प्रामाणिक सेवा केल्यानंतर म्हातारपणी कर्मचाऱ्यांनी उदरनिर्वाहासाठी कोणापुढे हात पसरावे? कर्मचाऱ्यांचे असुरक्षित झालेले भविष्य सुरक्षित करण्यासाठी जुनी पेन्शन योजना हाच पर्याय असून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन माध्यमातून लढा पुढे आला असून आता पेन्शन संघर्ष समन्वय समितीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचा मूलभूत अधिकार जुनी पेन्शन मिळवून देवू. सर्व कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन मिळवण्यासाठी निर्णायक आंदोलनासाठी तयार रहावे असे आवाहन यावेळी पेन्शन हक्क संघटन राज्य व जिल्हा पदाधिकारी यांनी केले
या मेळाव्यास महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष, वितेश खांडेकर, राज्यसचिव गोविंदभाई उगले, राज्य कार्याध्यक्ष प्राजक्त झावरे पाटील, जळगावचे जिल्हाध्यक्ष गोविंदा एम.ठाकरेपाटील, जळगावचे कार्यध्यक्ष संदीप पाटील, जामनेर तालुकाध्यक्ष सोपान पारधी, जळगाव राज्यप्रतिनिधी मुजीबुर रहमान, राज्य प्रवक्ता गजानन मंडवे, जिल्हा सहकार्याध्यक्ष धनराज वराडे आदींसह जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शिक्षक व सर्व कर्मचारी एकत्र आले होते. यावेळी ‘एकच मिशन जुनी पेन्शन. या घोषणेने सभागृह दणाणून सोडले