जळगाव-संदीप होले | माजी खासदार ईश्वरबाबूजी जैन यांच्या कुटुंबियांची मालकी असणार्या आर. एल. ज्वेलर्सवर सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने तब्बल दोन दिवस छापा टाकून कागदपत्रांसही रोख रक्कम जप्त केली. आज दुपारी ईश्वरबाबूजी जैन यांनी पत्रकारांशी बोलतांना या कारवाईबाबत इत्यंभूत माहिती दिली.
ईश्वरलाल जैन यांनी आज दिली सविस्तर माहिती
खान्देशातील सर्वात जुन्या तसेच अगदी देशभरात ख्यातप्राप्त मानल्या जाणार्या आर. एल. ज्वेलर्स ग्रुपवर काल अर्थात दिनांक १७ ऑगस्ट रोजी भल्या पहाटे सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीच्या पथकाने छापा टाकला. यात सराफा बाजारमधील या समूहाच्या मुख्यालयात पथक दाखल झाले. तात्काळ त्यांनी मुख्य दरवाजा बंद करून आतील कर्मचार्यांची चौकशी सुरू केली. यानंतर थोड्या वेळातच माजी खासदार तथा समूहाचे सर्वेसर्वा ईश्वरलाल जैन आणि त्यांचे पुत्र तथा माजी आमदार मनीषदादा जैन दाखल झाले. काल रात्री उशीरापर्यंत ईडीच्या पथकाने चौकशी केली. यानंतर याच पथकाने आज दुपारपर्यंत चौकशी केली. दुपारी ईडीचे पथक तपासणी करून निघून गेले. यानंतर आर.एल. ज्वेलर्सच्या बाहेर माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यात त्यांनी या छाप्याबाबत माहिती दिली.
स्टेट बँकेच्या थकीत प्रकरणी कारवाई
याप्रसंगी ईश्वरलाल जैन म्हणाले की, आमच्या समूहाने सुमारे नऊ-दहा वर्षांपूर्वी स्टेट बँकेकडून सुमारे सव्वापाचशे कोटी रूपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जफेडीचा वाद झाल्याने स्टेट बँकेने सीबीआयकडे तक्रार करून आमच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर बँकेने आम्हाला आधी गोल्ड लोन म्हणून चार टक्के व्याजाने कर्ज दिले असतांना नंतर कमर्शीयल कर्ज म्हणून तब्बल १८ टक्क्यांची आकारणी केली. यातून आम्हाला तब्बल ८० कोटी रूपये व्याजाच्या स्वरूपात द्यावे लागले. याच्या विरोधात आम्ही न्यायालयात गेलो असून याची सुनावणी सुरू आहे. कालच याची तारीख झाली असून एक महिन्यांनी याची पुन्हा सुनावणी होणार असल्याची माहिती बाबूजींनी दिली.
दबावातून करण्यात आली कारवाई : जैन
ईश्वरलाल जैन पुढे म्हणाले की, एकीकडे स्टेट बँकेने व्याज दराची अतिरिक्त आकारणी केल्यामुळे आम्ही हे कर्ज भरण्यास असमर्थ ठरलो. यातून हे प्रकरण न्यायालयात गेले असून याच प्रकरणी ईडीने आमच्या फर्मवर काल छापा टाकला. यात त्यांनी ८७ लाख रूपये रोख तसेच उपलब्ध सोन्याचा साठा जप्त केला आहे. त्यांनी माझ्यासह माझे पुत्र मनीष जैन आणि दोन्ही नातवांचे स्टेटमेंट घेतले असून चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. खरं तर माझे दुसरे पुत्र अमरीष जैन यांनी स्टेट बँकेवर दावा दाखल केला असून त्यांनी हा दावा मागे घ्यावा, याबाबत स्वाक्षरी करावी याबाबत बँक दबाव बनवत आहे. यातूनच ही कारवाई करण्यात आल्याचे प्रतिपादन ईश्वरलाल जैन यांनी केले.
ईडीची कारवाई चुकीची असल्याचा दावा !
दरम्यान, ईडीची ही कारवाई साफ चुकीची असल्याचा दावा देखील ईश्वरलाल जैन यांनी याप्रसंगी केला. या संदर्भात ते म्हणाले की, ईडीने राजमल लखीचंद एंटरप्रायजेस या फर्मवर छापा मारलेला असून या संस्थेचा आमच्या कर्जाशी काहीही संबंध नाही. ही फर्म मनीष जैन यांच्या दोन्ही पुत्रांच्या अर्थात माझ्या नातवांच्या नावावर आहे. यामुळे ईडीने केलेली कारवाई ही चुकीची असून आपण याच्या विरोधात लढणार असल्याचे प्रतिपादन ईश्वरबाबूजी जैन यांनी याप्रसंगी केले. स्टेट बँकेने आपल्या विरोधातील खटला स्क्वॅश अर्थात रद्द करावा यासाठी आपण न्यायालयात धाव घेतलेली असल्याचे प्रतिपादन देखील त्यांनी केले.
राजकीय संदर्भावर चुप्पी
दरम्यान, याप्रसंगी पत्रकारांशी ईश्वरबाबूजी हे शरद पवार यांच्या सोबत असल्यानेच ईडीने त्यांच्यावर कारवाई केली का ? अशी विचारणा केली. यावर बाबूजी यांनी थेट उत्तर दिले नाही. तथापि, आपण शरद पवार साहेबांचे निष्ठावंत असून पुढे देखील राहणार असल्याचे सांगितले. तर आपले पुत्र हे तिकडे गेले असल्याचे देखील त्यांनी नमूद केले.
खालील व्हिडीओत पहा ईश्वरबाबूजी जैन यांनी या प्रकरणाबाबत दिलेली माहिती.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/619488173502743