पाचोरा गणेश शिंदे । जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी मतदान झाल्यानंतर आता सर्वांना निकालाची उत्सुकता लागली आहे. येथे चुरशीची लढत झाली असल्यामुळे नेमकी बाजी कोण मारणार ? याबाबत एकच चर्वण सुरू असून अनेकांनी पैजादेखील लावल्या आहेत.
जळगाव लोकसभा मतदार संघाची निवडणूक ही अनेक ठिकाणी चुरशीची झाली असून या निवडणुकीत महाआघाडीचे गुलाबराव देवकर की महायुतीचे आ. उन्मेष पाटील निवडून येणार याविषयी या सर्वत्र चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिली टप्प्यात जळगाव लोकसभा मतदार संघासाठी २३ एप्रिल रोजी मतदान पार पडले. या लोकसभा निवडणुकीचा निकाल २३ मे रोजी लागणार असून या जळगावच्या जागेकडे महाराष्ट्रातील सर्वांचे लक्ष लागले आहे. जलसंपदा मंत्री ना गिरीष महाजन यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. यामुळे त्यांनी येथे प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याचे चित्र आधीच दिसून आले होते. याला विजयरूपी फळ मिळणार का ? याचीच आता सर्वांना उत्सुकता आहे.
आजवर जळगाव लोकसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात आहे. तथापि, या निवडणुकीत ही ओळख पुसुन निघेल का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. गुलाबराव देवकर यांनी आजवर बेरजेचे राजकारण केले असल्यामुळे त्यांना यावेळी अगदी विरोधातील काही गटांनीही मदत केल्याची चर्चा रंगली आहे. यामुळे बर्याच जणांना असे वाटते की गुलाबराव देवकरच निवडून येणार. तर काहींना मोदी लाटमुळे आमदार उन्मेष पाटील निवडून येण्याची शक्यता वाटते. अर्थात, यावरून अनेक ठिकाणी पैजाही लागल्या आहेत. उन्हाचा पारा तापला असतांनाच या राजकीय गावगप्पादेखील चांगल्याचे तापल्याचे यातून दिसून येत आहे.