गांधी परिवाराला असलेला धोका कमी झाला, असं नक्की कुणास वाटते? : शिवसेना

sonia gandhi
 

मुंबई (वृत्तसंस्था) गांधी परिवाराला असलेला धोका कमी झाला आहे. गृहमंत्रालयास वाटते म्हणजे नक्की कुणास वाटते? असे म्हणत शिवसेनेने . सामनातील अग्रलेखातून अप्रत्यक्षरित्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.

store advt

 

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या गांधी कुटुंबातील तीनही सदस्यांची एसपीजी कमांडोंची सुरक्षाव्यवस्था केंद्र सरकारने काढून घेतली असून केंद्रीय राखीव पोलिसांचा समावेश असलेली झेड प्लस सुरक्षा त्यांना पुरवण्यात आली आहे. ‘आयबी’ आणि ‘रॉ’ या गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गांधी कुटुंबाच्या जिवाला असणाऱ्या संभाव्य धोक्याबाबत आढावा घेतल्यानंतरच सुरक्षेत कपात करण्यात आल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाचे म्हणणे होते.

 

दिल्ली असेल किंवा महाराष्ट्र, वातावरण निर्भय असावे, सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्यांना बेडरपणे काम करता यावे असे वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची आहे. तशी स्थिती व वातावरण निर्माण झाले असेल तर गांधी परिवाराची सुरक्षा काढायला हरकत नाही. पण पंतप्रधान, गृहमंत्री, मंत्री व इतर सत्ताधारी पुढारी सुरक्षा ‘पिंजरे’ सोडायला तयार नाहीत व बुलेटप्रूफ गाडय़ांचे महत्त्व कमी झालेले नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे. गांधी परिवाराचे ‘एसपीजी’ कवच हटवून त्यांना ‘झेड प्लस’ वगैरे सुरक्षा व्यवस्था दिली आहे. खाद्याच्या जिवाशी खेळू नये व सुरक्षा व्यवस्थेचा खेळखंडोबा करू नये. ‘गांधी’ परिवाराच्या जागी इतर कोणी असते तरी आम्ही यापेक्षा वेगळी भूमिका मांडली नसती. इंदिरा गांधी यांचे हौतात्म्य आहेच. तसे राजीव गांधी यांचेही बलिदान आहे. राजीव गांधी यांनी श्रीलंकेशी शांती करार केला तेव्हाच त्यांच्या जीवितास धोका असल्याचा इशारा शिवतीर्थावरील सभेतून देणारे शिवसेनाप्रमुखच होते. त्यांनी केलेल्या शांती कराराबाबत मतभेद होतेच, पण शेवटी तो करार करण्यामागे तेव्हाच्या सरकारची एक भूमिका होती. प्रश्न इतकाच आहे की, ही सर्व पार्श्वभूमी असताना गांधी परिवाराची सुरक्षा व्यवस्था सरकारने काढून घेतली व त्यावर आवाज उठवणाऱ्यांना संसदेत बोलू दिले गेले नाही. इंदिरा गांधी या एका पक्षाच्या नव्हत्या. त्या राष्ट्राच्या होत्या हे ज्यांना मान्य आहे त्या सगळय़ांनी ही बाब गंभीर म्हणून स्वीकारायला हवी.

 

इंदिरा गांधी या पंतप्रधान पदावर असताना त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांची हत्या केली. खलिस्तानी अतिरेकी सुवर्ण मंदिरात घुसले होते व स्वयंघोषित संत भिंद्रनवाले याने सुवर्ण मंदिरातून देशाविरुद्ध युद्ध पुकारले होते. भिंद्रनवालेस पाकिस्तान आणि चीनचा उघड पाठिंबा होता. इंदिरा गांधी यांनी सुवर्ण मंदिरात रणगाडे घुसवून भिंद्रनवालेचा पाडाव केला. त्याचा बदला म्हणून इंदिरा गांधी यांची हत्या करण्यात आली. राजीव गांधी यांना तामीळ अतिरेक्यांनी मारले. तामीळनाडूतील एका प्रचारसभेत या उमद्या नेत्यास निर्घृणपणे मारले गेले. त्यामुळे गांधी परिवारास नंतर विशेष सुरक्षा व्यवस्था देण्यात आली. मात्र आता गांधी परिवारास धोका नसल्याचे कारण देत सरकारने ही सुरक्षा कमी केली आहे,असेही अग्रलेखात म्हटले आहे.

error: Content is protected !!