पाचोरा (प्रतिनिधी) भाजपाचे राज्य परिषद सदस्य डी.एम. पाटील यांनी आज येथे एका पत्रकार परिषदेत आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-सेनेची युती झाली किंवा नाही झाली तरी आपणच पाचोरा-भडगाव मतदारसंघातून भाजपातर्फे उमेदवारी करणार असल्याचे जाहीर केले. त्यांची ही घोषणा शिवसेनेचे लोकसभेचे स्वयंघोषित उमेदवार आर. ओ. पाटील यांना अप्रत्यक्ष उत्तर असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे. नेत्यांच्या या घोषणा-प्रतीघोषणांमुळे तालुक्यातील दोन्ही पक्षांचे सामान्य कार्यकर्ते मात्र संभ्रमात पडले आहेत.
शिवसेनेच्या वतीने लोकसभा मतदार संघातून माजी आर. ओ. पाटील यांनी येथील शिवसेनेचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी नुकत्याच घेतलेल्या ‘ जनसंवाद ’ कार्यक्रमात जळगाव लोकसभा मतदारसंघातून आपली स्वयंघोषित उमेदवारी जाहीर केली होती. भाजप-सेनेची युती झाली किंवा नाही झाली तरी मीच उमेदवार असेल अशी घोषणा त्यांनी केली होती. तेव्हापासूनच युतीची आस असलेल्या गटात अस्वस्थता होती. त्यात अन्य इच्छुकांची मोठी गोची झाली होती.
आजही सेना-भाजपाच्या युतीबाबत दोन्ही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते संभ्रमात आहेत. तरी पक्षाच्या आदेशाप्रमाणे कुठल्याही पदाधिकारी व नेत्यांनी मतभेद विसरून पक्ष संघटित करणे, पक्षाच्या झालेल्या कामाचा प्रचार करणे, यासह एकनिष्ठपणे पक्षाचा प्रचार करणे, असे घोषित करण्यात आले आहे. भाजपाचे डी. एम. पाटील यांच्या उमेदवारीच्या घोषणेवरून त्यांनी आर.ओ. पाटील यांना उमेदवारीबाबत जरा सबुरीचे धोरण घेण्याचा इशारा तर दिलेला नाही ना, अशी चर्चा तालुक्यात रंगली आहे.