Home उद्योग दादर-भुसावळ एक्स्प्रेसला नियमित दर्जा कधी? ; ३१ जुलैपर्यंत विशेष गाडीच सुरू

दादर-भुसावळ एक्स्प्रेसला नियमित दर्जा कधी? ; ३१ जुलैपर्यंत विशेष गाडीच सुरू


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खान्देशातील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरलेली दादर-भुसावळ विशेष एक्स्प्रेस गाडीला कायमस्वरूपी नियमित दर्जा देण्याबाबत हालचालींना वेग आला असला, तरी अंतिम निर्णयासाठी अजून प्रतीक्षा करावी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या संदर्भातील प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे प्रलंबित असून अधिकृत मंजुरी अद्याप मिळालेली नाही.

दादर-भुसावळ विशेष एक्स्प्रेसला नियमित गाडीचा दर्जा देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास गाडीला कायमस्वरूपी वेळापत्रकात समाविष्ट करून नवीन क्रमांक १९०४७/१९०४८ देण्यात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, याबाबतचे अधिकृत परिपत्रक अद्याप जारी झालेले नसल्याने प्रवाशांमध्ये अनिश्चितता कायम आहे.

भुसावळ रेल्वे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, गाडी नियमित करण्यासंदर्भातील कोणतेही अधिकृत आदेश किंवा सूचना अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत. रेल्वे बोर्डाकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतरच मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे या दोन्ही विभागांकडून संयुक्त परिपत्रक जारी केले जाईल. त्यानंतरच या गाडीला नियमित स्वरूपात धावण्यास सुरुवात होईल.

दरम्यान, सध्या ही गाडी विशेष दर्जातच सुरू असून विद्यमान वेळापत्रकानुसार ३१ जुलैपर्यंत सेवा सुरू राहणार आहे. त्यानंतरच्या कालावधीसंदर्भात कोणताही निर्णय अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. रेल्वे प्रशासनाला पुढील सूचना मिळाल्यानंतरच याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी बी. बी. तपस्वी यांनी सांगितले की, “दादर-भुसावळ विशेष गाडीला नियमित दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक अद्याप प्राप्त झालेले नाही. अंतिम मंजुरीनंतरच गाडी नियमितपणे सुरू होईल.”

या गाडीला नियमित दर्जा मिळाल्यास सध्या आकारले जाणारे अतिरिक्त विशेष भाडे बंद होण्याची शक्यता असून तिकीट दरात सुमारे २० ते २५ टक्क्यांनी घट होऊ शकते. त्यामुळे मुंबईत उपचारासाठी जाणारे रुग्ण, शिक्षणासाठी प्रवास करणारे विद्यार्थी तसेच व्यापारी वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः खान्देशातील प्रवाशांसाठी ही गाडी जीवनवाहिनी ठरत असल्याने नियमितीकरणाचा निर्णय लवकर व्हावा, अशी मागणी जोर धरत आहे.


Protected Content

Play sound