चारा छावण्या कधी सुरू होणार ?

कासोदा ता. एरंडोल राहूल मराठे । सध्या भीषण दुष्काळ असतांना गुरांसाठी चारा छावण्या सुरू करणे अपेक्षित असतांना प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि धर्मदाय संस्थांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजी पसरली आहे.

याबाबत वृत्त असे की, सध्या भीषण दुष्काळाच्या झळा सर्वांना बसत आहेत. यातच प्रशासनाची बेपवाई ही संतापजनक ठरत आहे. आता ग्रामीण भागातील धरणांमधील पाणीसाठा निम्यावर आला आहे. मागील वर्षी वरूण राजाने पाठ फिरवली त्यामुळे जमिनीत देखील पाणी कमी झाले आहे. त्याचा सर्वात मोठा फटका जनावरांना बसण्याची शक्यता आहे. चारा आणि पाण्याच्या टंचाई मुळे कवडीमोल भावात पशुधन विकण्याची वेळ शेतकरी व गुरांच्या मालकांवर आली आहे. असे असतांना तालुक्यात चारा छावण्या सुरू करण्यात आलेल्या नाहीत.

एकीकडे चारा छावण्यांसाठी प्रशासनाची अनास्था दिसून येत असतांना विविध धर्मदाय संस्थांनीही याकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. धर्मदाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी दि.१५नोव्हेंबर २०१८ रोजीच्या आदेशात म्हटले आहे की, राज्यांवर दुष्काळ पडला असतांना बँकेत भरभक्कम रक्कम असलेल्या धार्मिक संस्थांनी दुष्काळी भागात जनावरांसाठी चारा छावण्या सुरु कराव्यात. त्यांनी याबाबतचा आदेश दिला आहे. मात्र प्रशासनासह धार्मिक संस्थांनी यासाठी पुढाकार घेतलेला नाही. धार्मिक संस्थांना त्यांच्या कडील शिल्लक रकमेच्या प्रमाणात चारा छावण्या सुरू कराव्या लागतील,तसेच तसेच छावण्यात किती गुरे असावीत,हे ठरवावे लागेल त्यांवर धर्मदाय आयुक्त कार्यालयामार्फत नियंत्र ठेवले जाईल या चारा छावण्या पुढील जूनपर्यंत म्हणजे पावसाळा सुरू होई पर्यंत सुरू ठेवाव्या लागतील असे या आदेशात म्हटले आहे.

या चारा छावण्या यांच्यावर होणार्‍या खर्चावर देखरेख करण्याच्या सूचना संबंधित जिल्ह्यातील धर्मदाय आयुक्त कार्यालयातील अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत तरी देखील एरंडोल परिसरातील दुष्काळी भागात अजून देखील शेतकरी हवालदिल झाले आहेत गुरांसाठी चारा मिळत नसुन शेतात पाणी देखील नाही शेतकर्‍यांना आणि बाणीच्या परिस्थितीत दुग्धव्यवसाय करण्यासाठी गुरांना हिरवा चारा लागतो पण हिरवा चार्‍यासाठी पाणीच नाही तर दुग्ध व्यवसाय करावा कसा ? हा प्रश्‍न आहे. जनावरांसाठी हिरवा चारा नाही सरकी ढेप ही १५०० ते १६०० रुपये इतके महाग मिळत आहे. तर बाहेरून चारा विकत मागवावा लागत असून या जाचाला पशुधन मालक कंटाळले आहत. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि धर्मदाय संस्थांनी चारा छावण्या सुरू करण्याला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. मात्र असे होतांना दिसत नसल्यामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Add Comment

Protected Content