नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या प्रस्तावर उत्तर दिल्यानंतर आज ते राज्यसभेत आले. सुरुवातीला त्यांचे भाषण विरोधकांनी शांतपणे ऐकून घेतले. परंतु, त्यांच्या भाषणाने पकड घेतल्यानंतर विरोधकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. यामध्ये राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आघाडीवर होते. त्यांनी व्हेलमध्ये येऊन मोदींना भाषण थांबण्याची गळ घातली. या सर्व प्रकारावर संतापून राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी विरोधकांना समज दिली. अखेर विरोधकांनी सभात्याग केला. या सर्व प्रकारावरून जगदीप धनखड यांनी व्यतित होऊन विरोधकांनी मला पाठ दाखवली नसून संविधानाला पाठ दाखवली आहे, असं म्हटलं.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जोरदार भाषण केलं होतं. त्यावेळी त्यांनी भाजपा आणि आरएसएसला लक्ष्य करत मोदींवरही निशाणा साधला होता. त्यांच्या या प्रत्येक मुद्द्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत चोख प्रत्युत्तर दिलं. परंतु, हे उत्तर देताना लोकसभेत विरोधकांनी गोंधळ घातला. मात्र, या गोंधळातही मोदींनी त्यांचं भाषण सुरूच ठेवले अन् भाषण पूर्ण झाल्यावरच ते शांत बसले. त्यामुळे काल त्यांचा अलिखित विजय झाला, अशी चर्चा झाली.