मुंबई प्रतिनिधी । जलयुक्त शिवार योजना, बीएचआर सोसायटी घोटाळा, मुंबै बँक, आधीच्या सरकारची रस्ते कंत्राटे याबाबत व्यवहार चोख असतील तर इतका घाम फुटायचे कारण काय? असा सवाल आज शिवसेनेने भाजपला विचारला आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असणार्या दैनिक सामनात आज भाजपवर पुन्हा जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. यात म्हटले आहे की, महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी आहे. तसेच वातावरण तयार झाल्याचा सूर फडणवीस यांनी आळवला आहे. आणीबाणीसंदर्भात फडणवीस यांनी कोणतीही ठोस उदाहरणे समोर आणली नाहीत. पण राज्यातील वातावरण चांगले नाही, असे पालुपद त्यांनी चालवले आहे. सरकारच्या विरोधात बोलले की, तुरुंगातच टाकले जात आहे. कुठल्या तरी प्रकरणात अडकवले जात आहे, अशी ङ्गथापफ मारून त्यांनी सूर पकडण्याचा प्रयत्न केला. तो फसला. महाराष्ट्राइतके मोकळे वातावरण जगात कुठेच नसेल. स्वतः श्री. फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशीष शेलार यांच्यासारखे प्रमुख पुढारी रोज सरकारच्या विरोधात ङ्गडीजेफ लावल्याप्रमाणे ठणाणा करीत आहेत. रस्त्यांवर आंदोलन करीत आहेत. वृत्तपत्रांना मुलाखती देऊन खोटे आरोप करीत आहेत. सरकारच्या बदनामीच्या मोहिमा चालवीत आहेत. हे सर्व सुरळीत चालू असताना सरकारी यंत्रणा विरोधकांची मुस्कटदाबी करीत आहे, असे हे लोक कोणत्या तोंडाने सांगतात? असा प्रश्न यात विचारण्यात आला आहे.
यात पुढे म्हटले आहे की, धनगर आरक्षण, मराठा आरक्षण हे संवेदनशील विषय आहेत. कुणावरही अन्याय न होता आरक्षण मिळावे, ही शासनाची भूमिका आहेच. कायद्याची चौकट मोडू नये. त्या चौकटीत सगळ्यांना बसवायचे आहे. फेकूचंदांनी हे समजून घेतले पाहिजे. ठाकरे सरकारने भ्रष्टाचार व अनियमितता याबाबत जुन्या प्रकरणांच्या चौकशीची घोषणा केली. त्यावर विरोधकांनी इतके हडबडून जायचे कारण नाही. जलयुक्त शिवार योजना, बीएचआर सोसायटी घोटाळा, मुंबै बँक, आधीच्या सरकारची रस्ते कंत्राटे याबाबत व्यवहार चोख असतील तर इतका घाम फुटायचे कारण काय? शेणात तोंड बरबटले असेल तर कायदा काम करीलच व कायद्याने काम केले तर आणीबाणी आली असे बोंबलायचे. हा काय प्रकार आहे? प्रश्न इतकाच आहे की, ज्यांना महाराष्ट्रातील कथित आणीबाणीचा त्रास होतोय त्यांना देशातील एकांगी कारभार व हुकूमशाही प्रवृत्तीची भीती वाटत नाही.
यात शेवटी म्हटले आहे की, अठरा दिवसांपासून पंजाब-हरयाणाचा शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करतोय. त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारणे, अश्रुधूर सोडणे यास आणीबाणीचा कोणता प्रकार मानायचा? हे शेतकरी देशद्रोही आहेत, ते नक्षलवादी आहेत, त्यांना पाकिस्तान-चीनकडून अर्थपुरवठा होतो, असे बोलणे ही आणीबाणीचीच संस्कृती आहे. आणीबाणी पर्वात जयप्रकाश नारायण यांनाही देशद्रोही ठरवलेच होते. एकदा तर जयप्रकाश हे देशद्रोही असून आंदोलनासाठी बाहेरून धन गोळा करतात, असा आरोप केला गेला होता. त्यावेळी जे. पी. गरजले होते, काहीशी गर्वोक्ती वाटेल, पण ज्या दिवशी जे.पी. देशद्रोही होईल, त्या दिवशी या देशात कोणी देशभक्त उरणार नाही.फ असे सडेतोड उत्तर जे.पीं.नी दिलेच, पण आपल्या पै न् पैचा हिशेब सादर केला. महाराष्ट्रात आणीबाणी आहे की नाही हे जनता ठरवेल, पण दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या दडपशाहीचे काय? त्या आणीबाणीवर बोला! असे यात सुचविण्यात आले आहे.