१० कोटी लोकांपैकी २५० लोकांच्या मृत्यूमध्ये नवीन काय ? 

मुंबई वृत्तसंस्था ।  ‘जन्माला आलेला मरणारच आहे आहे हे गौतम बुद्धांनी सांगून ठेवलंय. सध्या होणारे मृत्यू हे कोरोनामुळे नव्हे तर निसर्गाच्या नियमानुसार होत आहेत. १० कोटींच्या लोकसंख्येत दोनशे-अडीचशे लोकांचा मृत्यू होतो यात नवीन काय?,’ असं परखड मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे.

सरकारला कोरोनाबद्दल काडीचीही माहिती नाही. तसं असतं तर आम्हाला एकही आंदोलन करावं लागलं नसतं. त्यांनीच स्वत:हून मंदिरं, बाजारपेठा खुल्या केल्या असत्या. पण प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलन करावं लागतंय. सरकार  लोकांना फसवतंय. आम्ही सरकारला पाच वर्षे राज्य चालवण्यासाठी निवडून दिलं आहे, आमचं आयुष्य नियंत्रित करायचा अधिकार दिलेला नाही. मी कुठे जायचं आणि कुठे नाही हे सांगायचा सरकारला अधिकार नाही,’ असं आंबेडकर म्हणाले.

सध्याचे मृत्यू निसर्गनियमानुसार होत असल्याचे प्रकाश आंबेडकरांचे मत 

कोरोना विषाणूमुळे कोणाचीही मृत्यू होत नसल्याचा ठाम दावा त्यांनी केला. ‘कोणीही अमरपट्टा घेऊन आलेला नाही. आजवर एकाही रुग्णालयाने कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे कागदोपत्री नमूद केलेले नाही,’ असंही ते म्हणाले. ‘लोक मोठ्या प्रमाणावर दगावले असते तर साथ आली असं म्हणता आलं असतं. पण तशी परिस्थिती नाही.  यापूर्वीचे आणि आताचे मृत्यूचे तुलनात्मक आकडे काढा. मृत्यूचा दर कमी झालेला आहे,’ असंही ते म्हणाले. कोरोनाच्या नावावर सुरू असलेल्या लुटीत जागतिक आरोग्य संघटनाही सहभागी आहे असा आरोप खुद्द अमेरिकेनं केलाय,’ असंही ते म्हणाले.

‘भाजपनं मंदिर उघडण्याची मागणी केलेलीच नाही. त्यांचा तो अजेंडा नाही. हिंदू धर्म मुस्लिमांविरोधात कसा वापरायचा एवढाच त्यांचा अजेंडा आहे. मुळात भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष नाही. तो मनुवादी पक्ष आहे. मंदिराचा मुद्दा हा वारकऱ्यांनी आमच्यापर्यंत आणलेला आहे. त्यानंतर आम्ही आंदोलन केलं,’ असं ते म्हणाले.

Protected Content