निर्माता संदीप सिंहचा भाजपशी काय संबंध ?; काँग्रेसचा सवाल

 

नवी दिल्ली,  वृत्तसंस्था । अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्युप्रकरणी चित्रपट निर्माता संदीप सिंह संदर्भात काँग्रेस आक्रमक झाला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संदीप सिंह याचे छायाचित्र व्हायरल झाले आहे. या वरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला आहे.  संदीप सिंह याला कोण वाचवत आहे, असा प्रश्न विचारत संदीप सिंहचे संबंध भाजपत कोणाशी जुळलेले आहेत, याबाबच माहिती मिळावी असे देशाला वाटत आहे, असे सिंघवी म्हणाले. फडणवीस किंवा गडकरी यांच्याकडून त्यांनी खुलाशाची अपेक्षा व्यक्त केलीय

आपण सुशांतसिंह राजपूतचे जवळचे मित्र आहोत, असा दावा संदीप सिंह याने अनेकदा केल्याचे अभिषेक मनु सिंघवी म्हणाले. याच संदीप सिंहने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित चरित्रपट बनवला होता. याचाच अर्थ संदीप सिंह जवळचा, आणि प्रिय व्यक्ती आहे. त्या चित्रपटाच्या पोस्टर्सचे लोकार्पण करण्यासाठी त्या कार्यक्रमाला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले होते. याचाच अर्थ संदीप सिंह ही काही सर्वसाधारण व्यक्ती नाही, असे सिंघवी म्हणाले. याच संदीप सिंहने गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्र भाजप कार्यालयात ५३ कॉल केले होते?… तो कोणाकडून सुरक्षा मागत होता?, असे प्रश्नही सिंघवी यांनी विचारले आहेत.

गडकरी आणि फडणवीसांना काँग्रेसचे प्रश्न
सिंघवी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पक्षाची बाजू मांडताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. सिंघली म्हणाले की, ‘संदीप सिंह हा एकमेव असा चित्रपट निर्माता आहे, ज्याच्यासोबत व्हायब्रंट गुजरात २०१९ मध्ये १७७ कोटी रुपयांचा करार करण्यात आला.

लीजेंड ग्लोबल स्टूडिओ असे कंपनीचे नाव आहे. या कंपनीला सन २०१७ मध्ये ६६ लाख रुपयांचे नुकसान झाले होते. कंपनीला सन २०१८ मध्ये ६१ लाखांचा फायदा आणि सन २०१९ मध्ये ४ लाखांचा तोटा सहन करावा लागला होता. हा करार कसा झाला?, या मुळेच इतक्या सगळ्या हालचाली सुरू आहेत?, मॉरिशसचा प्रश्न कसा सुटला?, संदीप सिंहला चरित्रपट कसा काय देण्यात आला?, संदीप सिंहने महाराष्ट्र भाजप कार्यालयात ५३ कॉल कसे काय केले?, कोण आहे तो नेता?, फडणवीस आणि गडकरी यांनी हे सांगावे.

Protected Content