धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे रविवारी ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता धरणगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जवळ भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करत अभिवादन करून समाज बांधवांनी एकजुट राहून आरक्षणासाठी लढा देण्याचे आवाहन केले.
यावेळी मनोज जरांगे पाटील मार्गदर्शन करताना मराठा समाज बांधवांना म्हणाले की, विरोधक हे मराठ्यांना आरक्षण मिळू नये, यासाठी एकत्र येत आपल्या विरोधात षडयंत्र रचत आहे. तसेच मराठा समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा देखील प्रयत्न करत आहे. त्यामुळे मराठा समाज बांधवांनी अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करत एकत्र लढून आपल्या भविष्यासाठी, आपल्या मुलांसाठी आरक्षण मिळावे. यासाठी एकत्रित लढा द्यावा असे आवाहन केले. धरणगाव शहरातील व तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने सायंकाळी ६ वाजता धरणगावात आगमन होताच मनोज जरांगे पाटील यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर सभा घेऊन समाज बांधवांना मार्गदर्शन करत मराठा आरक्षणासाठी लढा देण्याचे आवाहन केले.