Home Cities जळगाव जिल्ह्यात 2 व 3 डिसेंबरला आठवडे बाजार बंद: निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

जिल्ह्यात 2 व 3 डिसेंबरला आठवडे बाजार बंद: निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

0
112

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर मतदान आणि मतमोजणीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांच्या हद्दीत 2 आणि 3 डिसेंबर रोजी भरणारे आठवडे बाजार बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून त्याच दिवशी आदर्श आचारसंहिताही लागू झाली आहे. निर्धारित कार्यक्रमानुसार मतदान मंगळवार, 2 डिसेंबर रोजी तर मतमोजणी बुधवार, 3 डिसेंबर रोजी होणार आहे. या दोन्ही दिवशी जिल्ह्यातील अनेक नगर पालिका हद्दींमध्ये आठवडे बाजार भरत असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. अशा गर्दीमुळे निवडणुकीसंबंधी कामकाजात अडथळे निर्माण होऊ नयेत म्हणून प्रशासनाने आधीच खबरदारीचा उपाय अवलंबला आहे.

मुंबई मार्केट अँड फेअर्स अॅक्ट, 1862 च्या कलम 5 (अ) व (क) मधील अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी घुगे यांनी हा आदेश जारी केला आहे. आदेशानुसार 2 डिसेंबर (मतदान दिवस) आणि 3 डिसेंबर (मतमोजणी दिवस) या दोन्ही दिवशी जिल्ह्यातील नगर पालिका क्षेत्रांमध्ये भरविण्यात येणारे सर्व आठवडे बाजार बंद राहणार आहेत. यामुळे अनावश्यक गर्दी टाळून निवडणूक प्रक्रिया निर्विघ्न पार पाडता येईल, असे प्रशासनाचे मत आहे.

याचबरोबर नागरिकांना असुविधा होऊ नये म्हणून संबंधित आठवडे बाजार अन्य योग्य दिवशी भरविण्याची काळजी घ्यावी, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना दिले आहेत. बाजार भरविण्याच्या तारखा बदलताना व्यापारी, विक्रेते आणि नागरिकांना पूर्वसूचना देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचे हे पाऊल कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महत्त्वाचे मानले जात असून नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound