औरंगाबाद (वृत्तसंस्था) परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून बळीराजाला दिलासा देण्यासाठी तातडीने हेक्टरी २५ हजार रुपये मदत करण्याची गरज आहे. तर जाता जाता परतीचा पाऊसही मी पुन्हा येईन म्हणतो, त्याची भीती वाटते, असा टोला मुख्यमंत्र्यांना लगावत शिवसेना सत्तेत असेल की नाही हे येणाऱ्या दिवसांत कळेलच, असे सुचक वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केले आहे.
पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी दुपारी पत्रकारांशी संवाद साधला. शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. पण पाहणी दौरा हा हेलिकॉप्टरमधून करण्याचा नसतो, असा चिमटा त्यांनी मुख्यमंत्र्यांना काढला. तसेच पिक विमा कंपन्यांनीही आताच्या घडीला कागदी घोडे नाचवू नये. शेतकऱ्यांना त्वरीत मदत करावी. तसंच बँकांनी कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना नोटीसा देणं थांबवावं अन्यथा विमा कंपन्यांप्रमाणे सर्व बँकांना सरळ करण्याची ताकद शिवसेनेत आहे, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला. केंद्र सरकारने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून यावे. पंतप्रधान मोदींनी राज्यातल्या परिस्थितीकडे लक्ष द्यावे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.