मुंबई -लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भाजप राजकीय आकसापोटी विरोधकांवर कारवाई करत असल्याचा आरोप करत, वेळ आल्यावर आम्ही देखील पाहून घेऊ असा इशारा शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी दिला आहे.
शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीकडून धाड टाकण्यात असून परबांच्या संबंधित एकूण सात ठिकाणी छापेमारी करण्यात येत आहे. मुंबई, पुणे, दापोलीत ईडीकडून धाडसत्र सुरू आहे. यावरून शिवसेना नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. याबाबत शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, अनिल परब हे आमचे सहकारी आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत, पक्षाचे कडवट शिवसैनिक आहेत. अशा प्रकारच्या कारवाया गेल्या काही दिवसांपासून राजकीय सुडबुद्धीने सुरू आहेत. ज्याप्रकारचे आरोप अनिल परब आणि आमच्या इतर सहकार्यांवर लावण्यात येत आहेत त्यापेक्षाही गंभीर प्रकारचे गुन्हे भाजपच्या लोकांवर आहेत. पण त्यांना कुणीही हात लावत नाहीत. आम्ही सर्वजण, पक्ष, सरकार अनिल परब यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत.
संजय राऊत पुढे म्हणाले, तुम्ही सुडाच्या आणि बदल्याच्या भावनेने कितीही कारवाया केल्या तरी आमच्यावर कुठलाही दबाव येणार नाही. सर्व निवडणुका सुरळीत पार पडतील. सरकार सुरळीत चालेल. अशा कारवायांमुळे भाजप दररोज खड्ड्यात जात आहे. महाराष्ट्रातील राजकारणाला इतकं वाईट वळण गेल्या ५५ वर्षांत कधीच मिळालं नव्हतं. तुमच्या हातात केंद्रीय तपास यंत्रणा आहेत म्हणून आपल्या राजकीय विरोधकांना नामोहरण करायचं असं वाटत असेल तर शिवसेनेचे, महाविकास आघाडीचं मनोबल खच्चीकरण होणार नाही तर वाढेल. विक्रांत घोटाळा हा देशातील सर्वात मोठा घोटाळा आहे असं मी मानतो. शौचालय घोटाळा हा सुद्धा पुढे येईल. आम्ही पुरावे पाठवलेत पण कुणीही लक्ष देत नाही. पण एक लक्षात घ्या आम्ही सुद्धा पाहून घेऊ असा इशारा संजय राऊत यांनी याप्रसंगी दिला आहे.