आता ताकही फुंकून प्यावे लागेल ! : खडसे

अंबरनाथ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गाफील राहिल्याने राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला फटका बसल्याने आगामी निवडणुकीत ताकही फुंकून प्यावे लागणार असल्याचे प्रतिपादन एकनाथराव खडसे यांनी केले आहे.

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने तिकिट जाहीर केले असून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केला होता. ही निवडणूक २० जून रोजी होणार आहे. याआधी १० जूनला झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपने सत्ताधारी महाविकास आघाडीला जोरदार धक्का देऊन आपला तिसरा उमेदवार देखील निवडून आणला. या विजयाबाबत भाष्य करतांना भाजपच्या नेत्यांनी आता २० जून रोजी देखील चमत्कार होणार असल्याचा दावा केला आहे.

या पार्श्‍वभूमिवर, राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथराव खडसे यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, राज्यसभा निवडणुकीत आम्ही गाफील राहिल्याने पराभव झाला. हा पराभव शिवसेनेचा असला तरी महाविकास आघाडीला धक्का लागणार असल्याचे स्पष्ट आहे. यामुळे विधानपरिषद निवडणुकीत आम्हाला सावध रहावे लागणार आहे. या पराभवापासून धडा घेऊन या निवडणुकीत आम्हाला रणनिती तयार करावी लागेल. दुधामुळे तोंड पोळल्यामुळे आता ताक देखील फुंकून प्यावे लागणार असल्याचे प्रतिपादन एकनाथराव खडसे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: