मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धनुष्यबाण चिन्ह गोठविण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
काल रात्री केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दोन्ही गटांना शिवसेना हे नाव वापरण्यास देखील मज्जाव केला आहे. ठाकरे आणि शिंदे यांनी आपल्या पक्षाचे नाव आणि चिन्हे यांचे प्रत्येकी तीन पर्याय सादर करण्यासाठी सोमवारी दुपार पर्यंतची मुदत देखील देण्यात आलेली आहे. दरम्यान, हा निर्णय आल्यानंतर राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. यात प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. तर युवासेनेचे प्रमुख तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये आम्ही सत्यासोबत, सत्यमेव जयते अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. ”खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवेसना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही. लढणार आणि जिंकणारच! आम्ही सत्याच्या बाजूने! सत्यमेव जयते” असंही आदित्य यांनी ट्विटमध्ये म्हटलं. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो शेअर केला आहे.