नवी दिल्ली, वृत्तसंस्था । पाकिस्तानच्या वाचाळ बडबडीवर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यंत्री फारुख अब्दुल्ला यांनी प्रतिक्रिया दिलीय. ‘आपण कुणाच्याही हातचं बाहुलं नाही. पाकिस्ताननं नेहमीच जम्मू-काश्मीरच्या मुख्यधारेतील राजकीय पक्षांचा अपमान केलाय पण आता मात्र अचानक त्यांना प्रेमाचे उमाळे आलेत’ असं अब्दुल्ला यांनी म्हटलंय.
जम्मू काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर सहा राजकीय पक्षांनी सरकारच्या या निर्णयाविरुद्ध घोषणापत्र काढलं होतं. या घोषणापत्राचं पाकिस्तानकडून मोठं कौतुक करण्यात आलं. यावर, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी पाकिस्तानला चांगलेच खडे बोल सुनावलेत.
नुकतंच पाकिस्तान परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांचं वक्तव्य समोर आलं होतं. ‘नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, काँग्रेससहीत आणखी तीन पक्षांनी मिळून जे घोषणापत्र जाहीर केलं ती कोणतीही सामान्य घटना नाही तर हा महत्त्वपूर्ण घटनाक्रम आहे’ असं त्यांनी म्हटलं होतं.
‘मी स्पष्ट करू इच्छितो की आम्ही कुणाच्याही हातातलं बाहुलं नाही, ना दिल्लीचे आणि ना सीमेपलिकडील कुणाचे… आम्ही जम्मू – काश्मीरच्या जनतेप्रति उत्तरदायी आहोत आणि त्यांच्यासाठीच काम करू’ असंही फारुख अब्दुल्ला यांनी म्हटलंय.