वाझे, शिंदे आणि पालांडे ११ एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था । महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या दरमहा १०० कोटींच्या वसूली प्रकरणी सचिन वाझेसह संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टानं सात दिवसांची म्हणजेच ११ एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी मंजूर केली आहे.

११ एप्रिलपर्यंत हे तिन्ही आरोपी पुढील चौकशीकरता सीबीआयच्या ताब्यात राहतील. या प्रकरणातील मुख्य आरोपी अनिल देशमुख यांनाही अटक करण्याची कोर्टानं सीबीआयला परवानगी दिलेली असून देशमुख सध्या जेजे रूग्णालयात दाखल असल्यानं त्यांची अटक तूर्तास टळली आहे.

अनिल देशमुखांच्या चौकशीत राज्य सरकारही सहकार्य करत नाही असा थेट आरोप सीबीआयच्यावतीनं कोर्टात करण्यात आला. तसेच कोर्टाचे आदेश मिळताच अनिल देशमुखांच्या अचानक रूग्णालयात दाखल होण्यावरही सीबीआयनं सवाल उपस्थित केला.

अनिल देशमुखांची कस्टडीची कोर्टाकडनं परवानगी गुरूवारी मिळाल्यानंतर आर्थर रोड जेल प्रशासनानं सोमावरी त्यांची कस्टडी देऊ असं सांगितलं होतं. मात्र सोमवारी जेव्हा सीबीआयचे अधिकारी आर्थर रोड जेलमध्ये गेले तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की अनिल देशमुख बाथरूममध्ये पाय घसरून पडले ज्यात त्यांचा खांदा निखळल्यानं त्यांना जेजे रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अनिल देशमुखांशी संबंधित प्रकरणात जवळपास ४०० कोटींच्या भ्रष्टाचाराची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे. त्यामुळे आरोपींना दिल्लीला घेऊन जाऊन चौकशी करण्याची सीबीआयनं कोर्टाकडे मागणी केली होती.

मात्र विशेष कोर्टाचे न्यायाधीश ए.ए. सय्यद यांनी आरोपींना दिल्लीला घेऊन जाऊन चौकशी करण्याची परवानगी नाकारली. तसेच अनिल देशमुखांना अचानक जेजे रुग्णालयात दाखल करण्यासंदर्भात रिपोर्ट मागवण्यासही नकार दिला.

ईडीच्या तपासानंतर आता ११ एप्रिलपर्यंत हे तिन्ही आरोपी पुढील भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पुढील चौकशीसाठी सचिन वाझे, संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे या तिघेही सीबीआयच्या ताब्यात राहणार आहे.

Protected Content