अहिरवाडीत शिरले पाणी : प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील अहिरवाडी येथे अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला असून गावात पाणी शिरले असून काही कुटुंबांना प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी हलविले आहे.

( Image Credit Source : Live Trends News )

या संदर्भातील वृत्त असे की, रावेर तालुक्याला जुलै महिन्यात तिसर्‍यांचा अतिवृष्टीचा फटका बसला आहे. काल रात्रीपासूनच संततधार पाऊस सुरू असल्याने नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. यात रावेर तालुक्यातील अहिरवाडी गावात पाणी शिरल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे वृत्त आहे.

अहिरवाडी गावात आज दुपारपासूनच मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने ग्रामस्थ धास्तावले. गावातील अनेक भागात अगदी छातीपर्यंत पाणी वाहू लागल्याने गुराढोरांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागली. अहिरवाडी येथील स्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून असून येथील सहा कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आल्याची माहिती तहसीलदार बंडू कापसे यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजशी बोलतांना दिली आहे. तर वेळ पडल्यास आपत्कालीन पथक सज्ज असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान, अहिरवाडी गावात पाणी शिरल्याने काही काळ गावाचा रावेरशी संपर्क तुटल्याची स्थिती निर्माण झाली होती. तेथे अद्यापही संततधार पाऊस सुरू असल्याने ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचे आवाहन तालुका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

तर दुसरीकडे रावेर तालुक्यात सकाळ पासुन संततधार पाऊस कोसळत आहे. यातच सुकी नदीत रझोदा येथील एक जण वाहून गेल्याची माहीती समोर येथे आहे.तहसिलदार बंडू कापसे घटनास्थळी दाखल झाले असुन बेपत्ता झालेल्या युवकाचा एसडीआरएफ मार्फत शोध सुरु आहे.

Protected Content